breaking-newsपुणे

दोन मैत्रिणींच्या गप्पांची सुरेल शब्दमैफल

  • ‘संगीतात आवाज नाही, तर स्वर लागतो’

अभिजात संगीतातील मूलभूत संकल्पना रियाजातून आत्मसात करण्यासाठी केलेली मेहनत, गुरूंचे संस्कार आणि मनावर कोरल्या गेलेल्या त्यांच्या आठवणी जागवीत एकाच गुरूच्या मार्गदर्शनाखाली संगीत शिक्षण सुरू केलेल्या देवकी पंडित आणि आरती अंकलीकर-टिकेकर या दोन मैत्रिणींनी एकमेकींना कोपरखळय़ा मारत रंगविलेली गप्पांची सुरेल शब्दमैफल शुक्रवारी रसिकांनी अनुभवली.

आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित ६६व्या ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’तील ‘अंतरंग’मध्ये आग्रा-जयपूर घराण्याच्या गायिका देवकी पंडित आणि जयपूर-अत्रौली घराण्याच्या गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांनी रसिकांच्या साक्षीने संवाद साधला.

पं. वसंतराव कुलकर्णी आणि गानसरस्वती किशोरी आमोणकर या दोन गुरूंकडे संगीत शिक्षण घेतलेल्या या मैत्रिणींची कारकीर्द गप्पांतून उलगडली. त्यापूर्वी ‘षड्ज’मध्ये किराणा घराण्याचे संस्थापक उस्ताद अब्दुल करीम खाँ यांच्यावरील ‘जमुना के तीर’ हा लघुपट दाखविण्यात आला.

पंडित म्हणाल्या, स्वत:ला गळा नसताना शिष्यांकडून करून घेणं हे अवघड काम वसंतराव कुलकर्णी यांनी करून घेतले. घराण्याची तालीम मिळण्याआधी गाण्याकडे तटस्थपणे पाहण्याची सवय लावली. गाण्यात काय आवडलं हे सांगण्यासाठी विचार करायला लागायचा.

रियाजाच्या अतिताणामुळे माझा आवाज गेला. मी वर्षभर बोलू शकले नाही. गळा गाता करण्यासाठी दोन वर्षे लागली. माझा आवाज कुठला आणि तो कसा लागेल हे मला आत्मचिंतनातून उमजले. स्वर शोधावा लागतो तो सखोल आणि वरवरचा लागू शकतो. पण योग्य बिंदूपर्यंत गेलो तर स्वरांमध्ये डुंबता येते. सुराला सूर लावला म्हणजे जुळलं असं होत नाही. मी आवाज नाही पण स्वर लावते. किशोरीताई यांना भेटायला गेल्यानंतर त्यांनी घातलेल्या अटी मान्य केल्या आणि शिक्षण सुरू केले. पं. जितेंद्र अभिषेकीबुवा यांच्याकडे शिकताना त्यांनी आधीचे संस्कार विसरू नको, असे सांगितले. प्रकृती ठीक नसताना त्यांनीच मला पं. बबनराव हळदणकर यांच्याकडे शिकण्यासाठी पाठविले.

अंकलीकर म्हणाल्या, गुरू गायक नसतो तेव्हा आपल्या स्वप्नात मी गुरूला पाहू शकत नव्हते. हेच कारण मला किशोरीताई यांच्याकडे घेऊन गेले. त्यांची शिकवण्याची तळमळ आणि माझी रियाज करण्याबरोबरच त्यांचे मन राखण्याची तळमळ हे सारे अद्भुत होते. त्या नायगरा धबधब्यासारख्या कोसळायच्या. किती घ्यायचे हे शिष्याची औकात किती यावरही अवलंबून असते. गायकीचा स्वभावाशी संबंध असतो.

किशोरीताईंची शिकवण

संगीत गाताना आवाज नाही तर स्वर लावतो. राग म्हणून विचार मांडतो. हळुवारपणे उलगडणं म्हणजे गाणं. सूर, बंदिश, वादी-संवादी नाही तर त्यापलीकडे जाऊन आपण यमन होणं म्हणजे गाणं त्यासाठी रियाज, गाणं आहे हे किशोरीताई यांनी सांगितले. ते आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो, अशी भावना आरती अंकलीकर-टिकेकर यांनी व्यक्त केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button