breaking-newsक्रिडापुणेमहाराष्ट्र

पुणे लीग कबड्डी स्पर्धा: पुणे, बारामती, मुळशी, खेड यांची विजयी सलामी

पुणे: बलाढ्य बारामती, लय भारी मुळशी, झुंजार खेड व वेगवान पुणे संघांनी पुरुष विभागात विजयी सलामी देताना पुणे लीग कबड्डी स्पर्धेचा पहिला दिवस गाजविला. महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेस, प्रभाग क्रमांक 9, बाणेर बालेवाडी पाषाण यांनी बालेवाडी येथील श्री छत्रपती क्रीडा संकुल येथे ही स्पर्धा आयोजित केली आहे.

पुरुष विभागात बलाढ्य बारामती संघाने लयभारी पिंपरी चिंचवड संघावर 43-26 अशी मात केली. बारामतीच्या प्रणव नखाते यांने चढाईत 7 गुण, नीलेश काळबेरे याने 4 गुण, तर आदम शेख याने 3 गुण मिळविले. पिंपरी चिंचवड संघाच्या विनीत कालेकरने पाच गुण, प्रमोद घुले याने 2 गुण, तर अक्षय शिंदे याने दोन गुण मिळवीत लढत दिली.

दुसऱ्या सामन्यात माय मुळशी संघाने सिंहगड हवेली संघावर 30-22 असा विजय मिळविला. माय मुळशीच्या बबलू गिरी याने 5 गुण, अविनाश फडकेने 2 पकडी व रोहन सावंतने 4 गुण मिळविले. मध्यंतरानंतर मुळशीच्या शैलेश पिसाळ याने 4 गुण व आकाश दिसले याने 3 पकडी घेत आपल्या संघाला विजय मिळवून दिला.

तिसऱ्या सामन्यात झुंजार खेड संघाने छावा पुरंदर संघावर 29-23 अशी मात केली. प्रवीण मुळीक याने 9 गुण, मयूर पवारने 5 गुण, सद्दाम सोमदार व अभिजित चौधरी यांनी प्रत्येकी 3 गुण मिळवित खेड संघाला विजय मिळवून दिला. छावा पुरंदर संघाच्या अक्षय बोडके, गणेश आवळे व गणेश लोखंडे यांनी प्रत्येकी 5 गुण मिळविले.

चौथ्या सामन्यात वेगवान पुणे संघाने शिवनेरी जुन्नर संघावर 36-27 अशी मात करीत विजय संपादन केला. वेगवान पुणे संघाच्या गणेश कांबळे याने 10 गुण, तर चेतन पारधेने 8 गुण मिळवित पुण्याला विजय मिळवून दिला. शिवनेरी जुन्नर संघाच्या अक्षय जाधवने 10 गुण, तर सूरज पाचकुडवे व प्रथमेश निघोट यांनी प्रत्येकी 5 गुण मिळवीत चांगला प्रतिकार केला.

तत्पूर्वी स्पर्धेचे उद्‌घाटन पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघिरे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी महाराष्ट्र राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष अतुल बेनके, चाकण नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा पूजा चांदेरे, मुळशी तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष सुनील चांदेरे, स्पर्धेचे मुख्य संयोजक महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष व नगरसेवक बाबूराव चांदेरे व पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button