breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

दुसऱ्या टप्प्यात राजकीय नेत्यांना देणार लस, लोकांमधील भिती दूर करण्यासाठी निर्णय

नवी दिल्ली – देशात कोरोनावर प्रतिबंध करणाऱ्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. मात्र, अनेकठिकाणी झालेल्या लसीकरणानंतर मृत्यू झाल्याने लसीकरणाबाबत शंका व्यक्त केली जात आहे. मात्र आता दुसऱ्या टप्प्यामध्ये राजकीय नेत्यांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, सर्व खासदार, आमदार यांच्याबरोबरच इतर आजार असणाऱ्या राजकीय नेत्यांचे लसीकरण केलं जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे अनेक दिग्गज नेते हे ८० वर्षांहून अधिक वयाचे आहेत. ८० हून अधिक वय असणाऱ्या नेत्यांमध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, एचडी देवगौडा यांच्याबरोबरच भाजपाचे नेते लालकृष्ण अडवाणी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचाही समावेश आहे.

सरकारने कोरोना लसीकरणाची मोहीम टप्प्याटप्प्यांमध्ये राबवली जाणार असल्याचं आधीच स्पष्ट केलं आहे. कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा एप्रिल महिन्यामध्ये सुरु होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये ५० वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या मंत्र्यांबरोबर नेत्यांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे. यात अगदी पंतप्रधानांपासून सर्व मुख्यमंत्र्यांचाही समावेश आहे. सध्याची आकडेवारी पाहिली तर लोकसभेमधील तीनशेहून अधिक नेते ५० पेक्षा जास्त वर्षांचे आहेत. तर राज्यसभेमधील २०० हून अधिक खासदार हे वयाची पन्नाशी ओलांडलेले आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये भारत सरकार तीन कोटी वैद्यकीय कर्मचारी आणि पहिल्या फळीतील करोना योद्ध्यांना करोनाची लस देणार असून दुसरा टप्पा मार्चच्या शेवटी किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुरु होईल.

देशामध्ये कोरोनाची लसीकरण मोहीम सुरु होण्याच्या आधीच या लसीसंदर्भात अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार करोना लसीकरणाचे नियोजन करणाऱ्या राष्ट्रीय कृती दलाने देशातील २७ कोटी लोकांना कोरोनाची लस देण्यासाठी स्थानिक नेत्यांचा सहभाग महत्वाचा असेल असं म्हटलं आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार एखाद्या नेत्यानेच कोरोनाची लस घेतल्यास या लसीसंदर्भात लोकांमध्ये असणारा भ्रम दूर होऊन ते सुद्धा स्वइच्छेने कोरोना लसीकरणासाठी पुढे येतील.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button