breaking-newsपुणेमहाराष्ट्र

दुध संघांची “फुंकर’

  • शासन आदेशाला मुहूर्त; फॅट आणि एसएनएफच्या नियमावर बोट

पुणे – राज्य शासनाच्या आदेशानुसार खासगी व सहकारी दूध संघांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना 25 रुपये प्रतिलिटर देण्याचा दि. 1 ऑगस्टचा मुहूर्त साधला असला तरी आदेशाच्या अमंलबजावणीसाठी टाकण्यात आलेल्या अटी पाहता खिशाला झळ बसू न देताच शेतकऱ्यांना ठरवून दिलेला दर देण्याचा दूध संघांचा प्रयत्न असणार आहे.

राज्य शासनाने उत्पादकांना गाईच्या दुधाला प्रतिलिटर 25 रुपये दर देण्याचे आदेश दूध संघांना दिले आहेत. प्रत्यक्षात दि. 21 जुलैपासूनच हे दर देणे बंधनकारक होते. परंतू, आम्हाला हिशोब ठेवायला सोपे जावे म्हणून दि. 1 ऑगस्ट पासून वाढीव दर देण्याबाबतचा मुहूर्त खासगी व सहकारी दूध संघांनी काढून त्याबाबत सरकारला कळविले होते. यानुसार आजपासून अनेक दूध संघानी शेतकऱ्यांना 25 रुपये देण्यास सुरुवात केली असल्याचे सांगण्यात आले. परंतु, शेतकऱ्यांच्या खात्यात आज हे पैसे जमा झाले नव्हते. यामुळे शेतकरी आजही वाढीव दराच्या आशेवरच आहेत.

यासंदर्भात महाराष्ट्र राज्य दूध व्यवसायिक कल्याणकारी संस्थेचे उपाध्यक्ष गोपाळराव म्हस्के म्हणाले की, शासनाने दिलेल्या आदेशानुसार सर्वच दूध संघांनी आजपासून दूध उत्पादक शेतकऱ्यांना 25 रुपये दर देण्यास सुरुवात केली आहे. कुठल्याही संघाने याबाबत नकार दिलेला नाही. आजपासून वाढीव दरानेच शेतकऱ्यांकडून दूध खरेदी केली असल्याचेही म्हस्के यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, आजपासून शेतकऱ्यांना 25 रुपये दर दिला असल्याचे दुध संघांकडून सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हातात किती पैसे मिळाले, हे अद्याप समजू शकलेले नाही. काही दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार 25 रुपये दुधाचा दर देण्यासाठी संघांनी काही अटी लागू केल्या आहेत. गाईच्या दुधात 3.5 फॅट आणि 8.5 एसएनएफ असावे, अशा दुधालाच 25 रूपये भाव देण्यात येईल, अशी ती अट आहे. प्रत्यक्षात हे मानांकन राखणे शेतकऱ्यांना अवघड जाणार आहे. कारण, आपल्याकडील वातावरण तसेच उपलब्ध चाऱ्यानुसार गाईच्या दुधाचे मानाकंन नसतेच परिणामही दुधाचे दर शासनाने वाढविले असले तरी शेतकऱ्यांना कमी दर कमीच मिळणार आहे.

फॅटच्या अटीचा गोंधळ…
सोलापूर जिल्ह्यात तर फॅट आणि एसएनएफनुसार दुधाला फक्त 17 ते 20 रुपयांच्या आतच दर मिळत आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांमध्येही दूध संघ शासन आदेशाप्रमाणे दर देत नाहीत. या परिसरातील स्वाभिमानी दूध संघाने मात्र आम्ही 25 रुपये दर दिल्याचा दावा केला आहे. मदर डेअरीकडून गाईच्या दुधाला 21 रुपये 70 पैसे तर जळगाव जिल्ह्यात डेअरी 25 ते 26 रुपये दर देत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. एकूणच फॅटच्या अटीचा हा गोंधळ कायमच राहणार आहे.

शासन निर्णयानुसार आजपासून देण्यात येणाऱ्या वाढीव दूध दराचा पहिला दिवस असल्याने आम्हाला फारशी माहिती मिळालेली नाही. कारण, अनेक ठिकाणी दुधाचे पैसे हे तीन किंवा आठ दिवसांनी दिले जातात. यावर आमचे लक्ष राहणारच आहे. तक्रारी आल्याकी योग्य ती ऍक्‍शन घेतली जाईल.
– अॅॅड. योगेश पांडे, पुणे जिल्हा प्रतिनिधी, स्वाभिमानी संघटना

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button