breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

दादांवर प्रेम व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांत ‘चढाओढ’

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून घोषीत झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महिनाभरात झालेल्या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत किंवा प्रेसनोटमध्ये पालकमंत्री म्हणून अजित पवार यांचे नाव टाकले गेले नसल्याचा साक्षात्कार राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांना झाला आहे. हा मुद्दा उपस्थित करून अजितदादांवरचे प्रेम व्यक्त करण्यासाठी महापालिकेतील राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांमध्ये चढाओढ लागली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने महापौर चषक 2020 ट्वीन स्कूलोत्सव घेण्यात आला. त्याचा समारोप देखील झाला. चषक स्पर्धा घेण्यापूर्वी उपमहापौर तुषार हिंगे यांनी पत्रकार परिषद घेऊन याची माहिती दिली होती. दरम्यान, पालिकेच्या माहिती व जनसंपर्क विभागाकडून प्रसिध्द करण्यात आलेल्या प्रेसनोटमध्ये पालकमंत्री अजित पवार यांचे नाव नमूद केले नव्हते. तसेच, निमंत्रण पत्रिकेत देखील पवार यांच्या नावाचा उल्लेख केला नव्हता. याला एक महिन्याचा कालावधी उलटला. एवढ्या दिवसांत राष्ट्रवादीच्या एकाही पदाधिका-याला ही बाब निदर्शनास आणून द्यावी, असे वाटले नाही. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या शनिवारी (दि. 8) पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात येणार असल्याने या पदाधिका-यांना भाजप राजकारण करत असल्याचा साक्षात्कार झाला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांची दादांवरील प्रेमभावना जागृत झाली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांना कायमच डावलले जाते. यामागे राजकारण असले तरी प्रशासनाने उपमुख्यमंत्री तथा पालक मंत्री म्हणून अजित पवार यांच्या नावाचा उल्लेख करणे क्रमप्राप्त आहे. तरी, नावाचा उल्लेख केला जात नसल्यामुळे राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी महापौर वैशाली घोडेकर आणि माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी निवेदन काढून यापुढे साजरे होणा-या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत पालकमंत्री अजित पवार यांच्या नावाचा उल्लेख प्राधान्याने करण्यात यावा, अशी मागणी महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्याकडे केली आहे.

भाजपचा प्रोटोकॉल भाजपच्याच अंगलट

2014 च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजपचे सरकार आले. त्यावेळी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांची घोषणा झाली. त्यावेळी पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता होती. राष्ट्रवादीच्या तत्कालीन पदाधिका-यांनी देखील बापट यांचे नाव निमंत्रण पत्रिकेवर न घेता राजकीय खेळी केली. दरम्यान, भाजपच्या कथीत पदाधिका-यांनी पत्रक काढून पालिकेच्या कोणत्याही कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत पालकमंत्री गिरीष बापट यांच्या नावाचा उल्लेख करावा, ही प्रोटोकॉलची बाब असल्याचे शहानपण सूचवण्यात आले होते. नेमकं हाच मुद्दा अंगावर सोडत भाजपची ही खेळी असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांनी केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button