breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘दसऱ्याच्या मुहूर्ता’वर फुलांचे भाव कडाडले; झेंडुची सर्वाधिक मागणी

पिंपरी |महाईन्यूज|

कोरोना महामारी, लॉकडाऊन तसेच पावसामुळे यंदा फूल उत्पादकांना मोठा फटका बसला. मात्र खंडेनवमी व दस-यानिमित्त झेंडूसह इतरही फुलांना चांगली मागणी असल्याने उत्पादक आनंदात आहेत. पिंपरी येथील फूल बाजारात शनिवारी 40 टन झेंडूची आवक झाली. यात कलकत्ता तसेच साध्या गोंड्यालाही ग्राहकांनी पसंती दिली.

पिंपरी येथील फूल बाजारात शनिवारी मावळ, खेड, मुळशी या तालुक्यांसह, चर्होली, मंचर, चौफुला, तसेच अहमदनगर, सातारा, सांगली या ठिकाणाहून फुलांची आवक झाली. तसेच यंदा पहिल्यांदाच हिंगोली, नाशिक, बुलडाणा व बीड या जिल्ह्यांतून झेंडूची आवक झाली. दरवर्षी कर्नाटक, बेंगळुरू येथून मोठ्या प्रमाणात होणारी आवक यंदा झाली नाही. कोरोना महामारी व पावसामुळे ही आवक झाली नसल्याचे दिसून येते. परिणामी स्थानिक फूल उत्पादकांच्या फुलांना चांगली मागणी असून त्यांना दरही समाधानकारक ‍मिळत आहे. गेल्यावर्षी झेंडूला 100 रुपये असलेला दर यंदा प्रतिकिलो 160 रुपयांपर्यंत गेल्याने शेतकरी आनंदात आहेत.

पिंपरी येथील फूलबाजार रेल्वे स्टेशनजवळ होता. त्याचे काही दिवसांपूर्वीच स्थलांतर करण्यात आले. इंदिरा गांधी उड्डाणपुलाजवळील मोकळ्या जागेत विक्रेत्यांना 27 गाळे उपलब्ध करून देण्यात आले. स्थलांतरानंतर हा पहिलाच उत्सव आहे. त्यामुळे यंदाचा दसरा विक्रेत्यांसाठीही व्यावसायिकदृष्ट्या फायदेशीर ठरला आहे. नवीन बाजारामुळे दिवसभर फूलविक्री करता आल्याने त्यांच्याकडूनही समाधान व्यक्त केले जात आहे.

कोरोना व लॉकडाऊनमुळे धार्मिकस्थळे बंद आहेत. त्यामुळे फुलांना मागणी नाही. परिणामी शेतकऱ्यांना व विक्रेत्यांनाही मोठा फटका बसला. मात्र दसऱ्यांनिमित्त फुलांना मोठी मागणी आहे. त्यामुळे बाजारात चैतन्य आहे.

  • राजकुमार मोरे, अध्यक्ष, आडते संघ, पिंपरी-चिंचवड फुलबाजार

फुलांचा दर-
शेवंती – 300 (प्रति किलो)
गुलछडी – 400 ते 500 (प्रति किलो)
अष्टर – 50 (चार गुच्छ)
जरबेरा – 50 (10 फुलांचा गुच्छ)
डच गुलाब – 120 ते 140 (20 फुलांचा गुच्छ)
साधा गुलाब – 40 ते 50 (एक डझन)

झेंडूला प्रतिकिलो मिळालेला दर
साधे गोंडे 120 ते 130
कलकत्ता – 150 ते 160

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button