breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

दसऱ्याचं भाषण आणि कालची मुलाखत, मुख्यमंत्री पदावरील व्यक्तीला शोभणारी नाही – देवेंद्र फडणवीस

मुंबई – “महाविकासआघाडी सरकारची वर्षपुर्ती आणि अचिव्हमेंट याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सामनाला मुलाखत दिली. पण त्यामध्ये वर्षपूर्तीचा आढावा हवा होता, प्रश्न कसे सोडवणार, याबद्दलचं व्हिजन आवश्यक होतं. मात्र, ते दिसलंच नाही,” असा खोचक टोला भाजप नेते देवेंद्र फडणवी यांनी लगावला. भाजपकडून ठाकरे सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त कारभाराची पोलखोल करण्यासाठी देवेंद्र फडणवी यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार टिका केली.

महाराष्ट्रातील महाविकासआघाडी सरकारला आज (28 नोव्हेंबर) एक वर्ष पूर्ण होत आहे. या निमित्ताने भाजपकडून पत्रकार परिषदांचे आयोजन केले आहे. यावेळी भाजपकडून ठाकरे सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त कारभाराची पोलखोल केली जाणार आहे. नुकतंच भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत महाविकासआघाडीवर ताशेरे ओढले. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांच्या सरकारवर फडणवीसांनी सडकून टीका केली.

नुकतंच ठाकरे सरकारच्या 1 वर्षाच्या कामाची कार्यपुस्तिका म्हणजे काल न्यायालयाचे दोन निर्णय आले. त्यातील एक अर्णव गोस्वामी आणि दुसरा कंगना रनौतप्रकरणाचा होता. अर्णव गोस्वामी किंवा कंगना यांच्या सर्व विचारांशी आम्ही सहमत नाही, पण विरोधी विचारुन चिरडून टाकायचं याच्याशी तर आम्ही बिलकूल सहमत नाही. हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने ठाकरे सरकारला चपराक लगावली, आता कोर्टाला तुम्ही देशद्रोही ठरवणार का? असा प्रश्न भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.

“अर्णव गोस्वामी प्रकरणात सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारची कानउघडणी केलीय, कायद्याचा गैरवापर, किंवा सूडबुद्धीने करता येणार नाही असं स्पष्ट सांगितलं आहे. कंगना प्रकरणातही महापालिका आणि राज्य सरकारला चपराक लगावली आहे. अर्णव आणि कंगनाबाबत दोन्ही निर्णय म्हणजे कायद्याचा गैरवापराची उदाहरणे आहेत हे कोर्टाने दाखवलं आहे. हे दोन्ही निकाल आल्यानंतर कारवाई कुणावर होणार? गृहमंत्र्यांवर होणार की मुख्यमंत्री माफी मागणार? अधिकाऱ्यांनी गैरवापर केला तर त्यांच्यावर कारवाई होणार का?” असा सवालही देवेंद्र फडणवीस यांनी केला.

“मुख्यमंत्र्यांची मुलाखत टीका टिपण्णीत गेली, महाराष्ट्राच्या इतिहास इतकं धमकावणारे मुख्यमंत्री यापूर्वी पाहिले नव्हते, मुख्यमंत्री संयमी आहेत हे ऐकलं होतं, गेल्या 5 वर्षात पाहिलं, पण दसऱ्याचं भाषण आणि कालची मुलाखत, मुख्यमंत्री पदावरील व्यक्तीला शोभणारी नाही.” “पाच वर्ष सरकार चालवणार असे हे म्हणतात. तुम्ही चालवा पण १ वर्षात काय दिसलं? हे सरकार जनतेचा विश्वासघात करुन आलेलं आहे. माझ्याकडे 2 पानांची यादी आहे, या सरकारने केवळ स्थगिती देण्याचं काम केलं, कोरोनाकाळात हे सरकार सपशेल अपयशी ठरलं,” असेही फडणवीस म्हणाले.

“कोरोना काळात झालेला भ्रष्टाचार आम्ही उघडा पाडणार आहे. कोरोनाला हाताळण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. मी अनेक पत्र उद्धव ठाकरेंना पाठवली. पण त्यावर त्यांनी उत्तर दिली नाही. त्यावर उत्तर देऊ नका, पण त्यावर कारवाई केली असती, तर निदान आम्ही धन्यवाद दिले असते. देशात सर्वाधिक रुग्ण, सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात! रस्त्यावर मृत्यू, बाथरूममध्ये १५ दिवस मृतदेह पडून. इतके भीषण वास्तव असताना कोरोनाची स्थिती उत्तम हाताळली असे ते म्हणतात,” असेही फडणवीसांनी सांगितले.

“मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दिलेलं वचन लक्षात नाही? शेतकऱ्यांना दिलेल्या वचनाचं काय? स्थगिती पलिकडे या सरकारकडे दाखवण्यासारखे काही केले नाही. आरे कारशेडवर स्थगिती हा निर्णय मुंबईकरांवर अन्याय करणारा होता. “मराठा आरक्षणाचा मोठा घोळ केला. सर्वोच्च न्यायालयात वकील हजर राहत नाही. विद्यार्थ्याचे अतोनात हाल झाले. आम्ही हा कायदा करताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, हे सुनिश्चित केले होते,” असेही फडणवीसांनी यावेळी सांगितले.

“आपसात कोणताही समन्वय नाही आणि मुख्यमंत्री म्हणतात, तुमचे कुटुंब तुमची जबाबदारी. ते कितीही एकत्र आले तरी त्यांचे सरकार कसे चालले आहे, हे जनतेने पाहिले आहे. राजकारणात एक अधिक एक म्हणजे शून्य सुद्धा होतात. “आमच्या कितीही तक्रारी केल्या तरी जनतेच्या प्रश्नांवर आंदोलन करीत राहू, कारण हे सरकार नाकर्ते आहे आणि जनतेच्या प्रश्नांवर सरकारला जागे करणे, हे आमचे काम आहे,” असेही फडणवीस म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button