breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

तृतीयपंथीयांसाठी समुपदेशकांना प्रशिक्षण

मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटीचा पुढाकार

शहरातील तृतीयपंथीयांमध्ये एचआयव्हीचे प्रमाण गेल्या काही वर्षांत कमी होत असले तरी त्यांच्या आरोग्यासह सामाजिक अडचणी कायम असून त्या समजून घेण्यासाठी मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटीने पुढाकार घेतला आहे. मुंबईत तृतीयपंथीयांचा वावर अधिक असलेल्या भागांमधील समुपदेशकांना यासाठी खास प्रशिक्षण सोसायटीच्या वतीने दिले जात आहे.

शहरात मोठय़ा प्रमाणात तृतीयपंथीय असून यातील १६५ जणांवर एचआव्हीचे उपचार सुरू आहेत. त्यांना एचआयव्हीबाबत माहिती देणे, वारंवार तपासण्या करून घेणे, लैंगिक सुरक्षिततेबाबत सज्ञान करणे आदी कामे सोसायटीचे समुपदेशक करत असतात. परंतु त्यांच्याशी संवाद साधताना बऱ्याचदा अडचणी येतात.

तृतीयपंथीय म्हणजे कोण इथपासून त्यांच्यामधील विविध प्रकार आदी वैद्यकीय बाबींचे अज्ञान असल्याने आरोग्याबाबतच्या तक्रारी समजणे अवघड जाते. म्हणून तृतीयपंथीय राहत असलेल्या मुख्य विभागातील ३० समुपदेशकांसाठी तीन दिवसांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. समुपदेशकांचा या समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा आणि संवाद सुरू व्हावा या उद्देशाने प्रथमच असे प्रशिक्षण देण्यात येत असल्याचे मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटीच्या प्रकल्प अधिकारी डॉ. श्रीकला आचार्य यांनी सांगितले.

समाजाचा दृष्टिकोन बदलण्यासाठी प्रयत्न

मुंबईत राहत असलेल्या तृतीयपंथीयांच्या सातही घराण्यांच्या गुरूंसोबत बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत या समाजाला दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी जाणून घेण्यात आल्या. छत्तीसगड, गुजरात आदी जिल्ह्य़ांमध्ये या समाजासाठी अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. आपल्याकडे तृतीयपंथीय कल्याणकारी मंडळाच्या स्थापनेचे आदेश दिले असूनही अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. आरोग्य, नोकरी, शिक्षण आदी प्रश्नांसोबतच समाजाचा दृष्टिकोन बदलण्यासाठी एकत्रित आवाज उठविण्यासाठी सोसायटीने भविष्यात काही उपक्रम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे, असेही डॉ. आचार्य यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button