तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकन विदेश मंत्री जाणार चीनला
वॉशिंग्टन – दक्षिण चीन समुद्रातील चीनच्या आक्षेपार्ह हालचाली आणि तैवानला शस्त्रे विकण्याचा चीनचा निर्णय यामुळे अमेरिका आणि चीन यांच्यात सध्या मोठे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे संरक्षण मंत्री जेम्स मॅटीस हे याच आठवड्यात चीनच्या भेटीवर जात आहेत.
मॅटीस यांची संरक्षण मंत्री म्हणून ही पहिली चीन भेट आहे. मॅटीस हे चीन बरोबरच दक्षिण कोरिया आणि जपानच्याही दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांचा हा दौरा एकूण चार दिवसांचा आहे. चीनने दक्षिण चीन समुद्रात जहाज विरोधी क्षेपणास्त्रे, हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे, इलेक्ट्रॉनिक जामर्स, वुडी बेटांवर लढाऊ विमाने उतरण्याचा तळ अशी सगळी सामग्री उभारली आहे. त्यामुळे त्या परिसरतील देशांपुढे सुरक्षेचे आव्हान निर्माण झाले आहे.
आम्ही आमच्या हद्दीत ही सागरी सुरक्षा उभारली आहे आणि तशी संरक्षण सिद्धता ठेवण्याचा आम्हाला अधिकार आहे अशी भूमिका चीनने घेतली आहे. तथापी चीनची ही भूमिका तैवान, व्हीएतनाम, मलेशिया, इंडोनेशिया, फिलीपाईन्स या देशांना मान्य नाही. त्या संबंधात मॅटीस हे चीनी नेत्यांशी चर्चा करणार आहेत. मॅटीस यांनी संरक्षण मंत्री झाल्यानंतर आत्तापर्यंतच्या 17 महिन्याच्या कालावधीत सात अशियाई देशांना भेटी दिल्या आहेत. पण ते अजून चीनला गेलेले नाहीत.