TOP Newsताज्या घडामोडीपुणे

डाळिंबाचे फक्त वीस टक्के उत्पादन हाती; सलग चौथ्या वर्षी तडाखा

पुणे : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे रौद्ररूप हळूहळू समोर येऊ लागले आहे. खरीप हंगामातील पिकांच्या नुकसानीसह फळपिकेही हातची गेली आहेत. शेतकऱ्यांना चांगले आर्थिक उत्पन्न आणि देशाला परकीय चलन मिळवून देणाऱ्या डाळिंबाचा मृग बहार सलग चौथ्या वर्षी नुकसानीत गेला आहे. केवळ वीस टक्केच उत्पन्न हाती आले आहे. यामुळे डाळिंब उत्पादक शेतकरी मोडून पडला आहे.

गेल्या दोन वर्षांपासून खोडकिडीमुळे राज्यातील सुमारे साठ टक्क्यांपर्यंत डाळिंबाच्या बागा काढून टाकल्या आहेत. उरलेल्या डाळिंबाला यंदाच्या अतिवृष्टीचा आणि परतीच्या पावसाचा फटका बसला. डाळिंबाच्या बागांना पोषक हवामान कमी पावसाच्या, कोरडे हवामान  असलेल्या भागात असते. नेमक्या याच भागाला यंदा पावसाचा फटका बसला. पावसामुळे कुजवा, तेल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढून पीक हातचे गेले आहे. केवळ वीस टक्के उत्पन्न हाती आले आहे.

डाळिंब उत्पादन संघाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सुमारे एक लाख हेक्टर डाळिंबाचे क्षेत्र आहे. त्यापैकी ४० हजार हेक्टरवरील डाळिंबाचा मृग बहार धरला जातो. यंदा फुले, कळीच्या येण्याच्या अवस्थेत हवामान दमट राहिल्यामुळे कळींची गळ झाली. शिवाय फळाचा आकारही वाढला नाही. पेरुच्या आकाराचे फळ होताच त्यावर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला. शेतात पाणी साचून राहिल्यामुळे फळकुजही झाली. पूर्ण हंगामात पोषक हवामानच न मिळाल्यामुळे डाळिंबाच्या फळांचा आकार अपेक्षेप्रमाणे वाढला नाही. ४० हजार हेक्टरपैकी ३० हजार हेक्टरवरील बागांचे ऑक्टोबरमध्येच नुकसान झाले होते. सध्या डाळिंबाची काढणी सुरू झाली आहे. डाळिंबाला सरासरी १०० ते १५० रुपये प्रति किलो आणि निर्यातक्षम डाळिंबाला २०० रुपये प्रति किलोचा दर मिळत आहे. दर चांगला मिळत असला तरीही उत्पादन कमी मिळत असल्यामुळे डाळिंबाला घातलेला खर्चही निघत नाही.

उत्पादन, निर्यातीत मोठी घट

राज्यातून दरवर्षी सरासरी दोन हजार टनाच्या जवळपास डाळिंबाची निर्यात होते. पण, मागील दोन-तीन मृग बहारातील डाळिंबाला पावसाचा फटका बसतो आहे. त्यामुळे उत्पादनात घट होतेच, शिवाय दर्जाही घसरतो आहे. त्यामुळे राज्यातून होणारी डाळिंबाची निर्यातही घटली आहे. यंदाही केवळ ४०० टन निर्यात होईल. निर्यातीचे चित्र फारसे समाधानकारक राहणार नाही, अशी माहिती डाळिंब उत्पादक संघाचे अध्यक्ष प्रभाकर चांदणे म्हणाले.

नैसर्गिक आपत्तीपुढे डाळिंब उत्पादक टिकू शकत नाही. डाळिंबाचा समावेश संरक्षित शेतीत करण्यात आला आहे. पण, अद्याप त्याची अंमलबजावणी सुरू नाही. युरोपला निर्यात झाली तरच चांगले पैसे मिळतात. पण, युरोपसह आखाती देशांना होणारी निर्यात घटली आहे. बांगलादेशला डाळिंब जात असले तरीही आर्थिकदृष्टय़ा ते फार फायदेशीर ठरत नाही. यंदा पावसामुळे ६० ते ७० टक्क्यांपर्यंत नुकसान झाले आहे.

– प्रभाकर चांदणे, अध्यक्ष, अखिल भारतीय डाळिंब संघ

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button