breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

ठेकेदार, अधिकार्‍यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा – उपमहापाैर तुषार हिंगे

ऑक्सीजन पुरवठा करणार्‍या यंत्रणेचे तात्काळ ऑडीट करा, आयुक्तांना पत्र

पिंपरी |महाईन्यूज|

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात अपुर्‍या गॅस पुरवठ्यामुळे करोनाबाधित रुग्णांच्या झालेल्या मृत्यूला महापालिकेचा वैद्यकीय विभाग, ठेकेदार व रुग्णालयातील अधिकारी जबाबदार आहेत, असा आरोप उपमहापौर तुषार हिंगे यांनी केला आहे. त्यामुळे रुग्णांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अधिकारी व ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, ऑक्सीजन पुरवठा करणार्‍या यंत्रणेचे सात दिवसात ऑडीट करावे, अशी मागणी हिंगे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

याबाबत उपमहापौर हिंगे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात घडलेला प्रकार हा माणुसकीला काळीमा फासणारा आहे. ठेकेदाराच्या चुकीमुळे रुग्णांचा जीव गेल्यानंतरही ठेकेदाराला वाचविण्याचा आटापिटा सुरू आहे. वायसीएम रुग्णालयातील आक्सीजन पुरवठा करणारी पाईपलाईन ही मेडिकल कॉन्सिल ऑफ इंडियाच्या (एमसीआय) मानांकनानुसार नसल्याची बाब मी स्वत: जानेवारी 2020 मध्ये आपल्या निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतरही केवळ संंबंधित ठेकेदार पोसण्यासाठी आपण कोणतीही कार्यवाही अथवा निर्णय घेतला नाही.

वायसीएम रुग्णालयातील ऑक्सीजन पुरवठा करणारी यंत्रणा एमसीआयच्या मानांकनानुसार पाईपलाईन असती तर बुधवारी (दि.22) निष्काळजीपणा घडून निष्पाप लोकांचा जीव गेलाच नसता. आपल्या प्रशासकीय यंत्रणेेने केलेल्या दूर्लक्षामुळे अनेकांचा जीव जाण्याचा प्रकार घडला. यामध्ये तात्काळ सुधारणा न केल्यास यापुढेही अशी दूर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सध्या पुरवठा सुरू असलेल्या ऑक्सीजन पाईपलाईनचे सात दिवसांत ऑडीट करावे तसेच एमसीआच्या मानांकनानुसार ऑक्सीजनची पाईपलाईन तात्काळ टाकण्यात यावी. आपण तात्काळ हा निर्णय न घेतल्यास आणि ऑक्सीजनच्या चुकीच्या पुरवठ्यामुळे एखाद्याचा मृत्यू झाल्यास त्याला आपण आयुक्त या नात्याने जबाबदार राहाल आणि यापुढील होणार्‍या परिणामांना आपणांस सामोरे जावे लागेल, असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button