breaking-newsताज्या घडामोडी

#CoronaVirus: कोरोना व ईदच्या पार्श्‍वभूमीवर मालेगावात पोलिसांचा ‘रूट मार्च’

रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून शहरात पोलिसांनी जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. आरती सिंह यांच्या नेतृत्वाखाली आज धडक सशस्त्र संचलन  (रूट मार्च) केले. या निमित्ताने शहरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने शहराला लष्करी छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

मालेगाव शहर करोना संसर्गाचेदृष्टीने हॉटस्पॉट ठरत आहे. त्याला प्रतिबंध करण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा डोळ्यात तेल घालून प्रयत्नशील आहेत. अशा स्थितीत संसर्गाचा आणखी धोका वाढू नये म्हणून रमजान ईदच्या निमित्ताने इदगाह मैदान वा मशीदींमध्ये केल्या जाणाऱ्या नमाज पठणास यंदा प्रशासनाने मनाई केली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांनी घरातच नमाज पठण करावे असे आवाहन पोलीस दलातर्फे करण्यात आले. शहरातील प्रमुख मौलाना आणि लोकप्रतिनिधी हेदेखील त्यासाठी लोकांचे प्रबोधन करीत आहेत.

असे जरी असले तरी नमाज पठणावरून शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी खबरदारी घेत दोन पोलीस अधीक्षक, दोन अप्पर पोलीस अधीक्षक, पाच उप अधीक्षक, २२ पोलीस निरीक्षक, १०५० पोलीस, तीन आरसीपी प्लाटून, एक धडक कृती दलाची कंपनी, सहा राज्य राखीव दलाच्या कंपन्या, १५० गृह रक्षक दलाचे जवान असा प्रचंड बंदोबस्त शहरात तैनात करण्यात आला आहे.

तसेच, चार ड्रोन कॅमेरांद्वारे शहरातील सर्व हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. याशिवाय धडक कृती दल, राज्य राखीव दल व सशस्त्र पोलिसांतर्फे शहरात सुमारे सात किलोमीटर अंतराचे संचलन करीत शक्तीप्रदर्शन करण्यात आले.  ईदगाह मैदानापासून या संचलनास प्रारंभ झाला.  मोसम पूल, मूशावरात चौक, फत्ते मैदान, मामलेदार गल्ली, चंदनपुरी गेट, महापालिका कार्यालय, सरदार चौक या मार्गाने गेल्यानंतर पोलीस नियंत्रण कक्षात या संचलनाचा समारोप करण्यात आला. विशेष पोलीस महानिरीक्षक छोरिंग दोरजे, जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. आरती सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप घुगे आदी अधिकारी बंदोबस्तावर व शहरातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button