ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ; मराठवाडा-विदर्भातील शेतकऱ्यांचं सावकारी कर्जही माफ
औरंगाबाद | विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे सावकारी कर्जही माफ होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी याबाबचा निर्णय घेतला आहे. नुकतंच पणन आणि वस्त्रोउद्योग मंत्रालयाने याबाबतचा शासन निर्णय जाहीर केला आहे.
यानुसार विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकारांकडून कर्ज घेतले असतील, तर शासनामार्फत संबंधीत सावकारास ती रक्कम अदा करण्यात येईल. त्यामुळे सावकारी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचे कर्जही माफ होणार आहे.
विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकारांकडून घेतलेले कर्ज शासनामार्फत संबंधित सावकारास देण्यात येईल. अशा शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
सावकाराने सावकारी परवान्यात नमूद केलेल्या क्षेत्राच्या बाहेर दिलेले कर्ज या योजनेस अपात्र ठरवण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर ही अट रद्द करुन ज्या सावकारांनी कार्यक्षेत्राबाहेर कर्जवाटप केले आहे. त्या शेतकऱ्यांची कर्ज माफ करण्यास मान्यता देण्यात आली आहे, असे शासनाच्या निर्णयात नमूद करण्यात आलं आहे.