breaking-newsपिंपरी / चिंचवड

जुन्या सांगवीत रोगाट झाडांच्या त्रासातून नागरिकांची मुक्तता

  • शहर मनसेचे उपाध्यक्ष राजू सावळे यांचा यशस्वी पाठपुरावा

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

जुनी सांगवी परिसरातील प्रियदर्शनीनगर मुख्य रस्त्याच्या कडेला महापालिकेच्या काही झाडांवर रोग पडलेला आहे. त्यातून निघणारी पांढऱ्या रंगाची पावडर हवेत मिसळून परिसरातील वाहनांवरून जाणाऱ्या नागरिकांच्या अंगावर, तसेच आजूबाजूच्या दुकानात, भाजी विकणाऱ्या हातगाड्यांवरील फळभाज्यांवर, तसेच घराशेजारी लावलेल्या वाहनांवर पडत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक मेटाकुटीस आले होते.

मात्र, झाड तोडणे हा कायद्याने गुन्हा ठरत असल्याने, सर्वचजण झाडापासून पसरणाऱ्या पावडरचा बिनबोभाट त्रास सहन करीत होते. याबाबत पिंपरी चिंचवड शहर मनसेचे उपाध्यक्ष राजू सावळे यांनी सांगवीतील उद्यान विभागाचे उद्यान अधिक्षक यांना या समस्येबाबत निवेदन देऊन, झाडाची पाहणी करून, झाडाची विल्हेवाट लावण्याची मागणी केली होती. वेळोवेळी स्मरणपत्रे दिली. तरी देखील उद्यान विभागाने याची दखल घेतली नाही. अखेरीस आंदोलनाचा इशारा देताच, उद्यान विभागाच्या कर्मचाऱ्यांनी परिसराला भेट दिली व या वृक्षांच्या फांद्यांची छाटणी केली. तसेच निघणाऱ्या पांढऱ्या पावडरला अटकाव केला. यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

याबाबत माहिती देताना सावळे म्हणाले की, प्रियदर्शनीकडून ममतानगरकडे जाताना मुख्य रस्त्याच्या कडेला महापालिकेच्या मालकीची काही झाडे आहेत. त्यामधील दोन झाडांवर रोग पडला आहे. मुख्य रस्ता वर्दळीचा असल्याने जवळच असलेली दुकाने, काही इमारती व येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना या झाडावरील पांढऱ्या रंगाची पावडर अंगावर पडून त्रास होत होता. ही पावडर हवेत मिसळत असल्याने या भागातील लहान मुलांना व जेष्ठ नागरिकांना श्वसनाचा त्रास सहन करावा लागत होता.

पार्किंगला लावलेल्या वाहनांवर पावडर उडून वाहनांना गंज चढू लागला होता. त्यामुळे या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. त्यामुळे दोन्ही झाडांची छाटणी करुन, नागरीकांची होणाऱ्या त्रासापासून मुक्तता करण्याची मागणी महापालिकेच्या उद्यान विभागाकडे केली होती. उद्यान विभागाने विलंबाने का होईना त्याची दखल घेतली. मुळात तात्पुरता हा विषय संपलेला आहे. भविष्यातही हा त्रास जनतेला होणारच आहे. त्यामुळे मुळापासुनच ही दोन्ही झाडे उखडून टाकावीत, अशी आमची मागणी राहणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button