breaking-newsपुणेमहाराष्ट्रराष्ट्रिय

जानेवारीत स्वाइन फ्लूचे नवीन अकरा रुग्ण

७४ हजार प्राथमिक रुग्णांची तपासणी; ७९४ रुग्णांना टॅमिफ्लू

स्वाइन फ्लूचे प्रमाण आटोक्यात आल्याचे चित्र २०१८ च्या अखेरीस निर्माण झाले असताना नवीन वर्षांत या आजाराने पुन्हा डोके वर काढले आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवडय़ात स्वाइन फ्लूचा फैलाव लक्षणीयरीत्या वाढला असून नऊ नवीन रुग्णांना आजाराची लागण झाली आहे.

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून याबाबत माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. सोमवार (२८ जानेवारी) पर्यंत सुमारे चौऱ्याहत्तर हजार नवीन रुग्णांची प्राथमिक तपासणी करण्यात आली. त्यांपैकी सातशे चौऱ्याण्णव रुग्णांना टॅमिफ्लू हे औषध तातडीने सुरु करण्यात आले. एकशे सेहेचाळीस रुग्णांच्या थुंकीचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असता त्यातील अकरा रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यापैकी पाच रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. त्यातील दोन रुग्ण वॉर्डमध्ये तर तीन रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. उपचारांनंतर एका रुग्णाला घरी सोडण्यात आले आहे. कोंढवा आणि धायरी परिसरातील दोन रुग्णांचा मृत्यू स्वाइन फ्लूमुळे झाल्याचे तपासणीअंती निष्पन्न झाले आहे.

पुणे महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे म्हणाले,की जानेवारी महिन्याच्या पहिल्या दोन आठवडय़ांमध्ये स्वाइन फ्लू आटोक्यात आल्याचे चित्र होते, मात्र सकाळी आणि संध्याकाळी थंडी तर दिवसभर कडक ऊन असे विषम वातावरण असल्याने स्वाइन फ्लूच्या विषाणूचा फैलाव होण्यासाठी पूरक वातावरण निर्माण झाले आहे. आरोग्य विभागाकडे औषधे आणि लसीचा पुरेसा साठा आहे, मात्र रुग्णांनी प्राथमिक लक्षणांकडे दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. फेब्रुवारी महिन्यात थंडी नियंत्रणात येईल तसा स्वाइन फ्लूचा धोका कमी होणार असल्याने नागरिकांनी घाबरुन जाऊ नये असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

बिबवेवाडी कोंढवा रस्त्यावरील हर्ष रुग्णालयाचे डॉ. राजीव छाजेड म्हणाले,की आमच्या रुग्णालयात पासष्ट वर्षीय रुग्ण स्वाइन फ्लूची लक्षणे तीव्र स्वरुपात दिसत असल्याने उपचारांसाठी आले. त्यांच्या थुंकीचे नमुने तपासणीसाठी पाठवले असता निगेटिव्ह अहवाल मिळाला, मात्र त्यांची परिस्थिती चिंताजनक असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. एचवन एनवन चाचणीचा अहवाल निगेटिव्ह असला तरी स्वाइन फ्लूच्या उप-प्रकारांमुळे रुग्णाला गंभीर स्वरुपाचा त्रास होऊ शकतो, हे लक्षात ठेवून अहवाल निगेटिव्ह असेल तरीही टॅमिफ्लूचा पाच दिवसांचा कोर्स रुग्णाने पूर्ण करणे अत्यावश्यक आहे.

कोथरुड येथील जनरल फिजिशियन डॉ. सुहास नेने म्हणाले,की थंडीचा जोर वाढीस लागताच लहान मुलांमध्ये स्वाइन फ्लू सदृश लक्षणे दिसण्याचे प्रमाण वाढले आहे. दहा वर्षांखालील मुलांना टॅमिफ्लू हे औषध सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये तीव्र ताप, दमा लागणे, अंगदुखी अशी लक्षणे दिसल्यास त्यांना शाळेत पाठवू नये.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button