breaking-newsक्रिडा

जागतिक दर्जाचे ड्रॅग-फ्लिकर्स विकसित करण्याची गरज!

माजी हॉकीपटू दिलीप तिर्की यांची सूचना

भुवनेश्वर येथे नुकत्याच झालेल्या विश्वचषक हॉकी स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्याची सुवर्णसंधी गमावणाऱ्या भारताने भविष्यात जागतिक दर्जाचे ड्रॅग-फ्लिकर्स घडवण्याची नितांत आवश्यकता आहे, अशी प्रतिक्रिया माजी हॉकीपटू दिलीप तिर्की यांनी रविवारी व्यक्त केली.

विश्वचषक हॉकी स्पध्रेत यजमान भारताला उपांत्यपूर्व फेरीत नेदरलँड्सकडून २-१ असा पराभव पत्करावा लागला. रुपिंदर पाल सिंगच्या अनुपस्थितीत हरमनप्रीत सिंग, अमित रोहिदास व वरुण कुमार यांनी भारतासाठी ड्रॅग-फ्लिकर्सची भूमिका बजावली. मात्र त्यांना फक्त सरासरी ३०.७ टक्क्यांपर्यंतच मिळालेल्या संधीचे गोलमध्ये रूपांतर करता आले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धदेखील भारताला पाचपैकी तीन पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्यात अपयश आले.

भारताच्या कामगिरीचे विश्लेषण करताना तिर्की म्हणाले, ‘‘आपल्याला अव्वल दर्जा असलेल्या ड्रॅग-फ्लिकर्सची गरज आहे. सध्या भारताच्या ताफ्यात हरमनप्रीत, अमित व वरुण हे तीन ड्रॅग-फ्लिकर्स असून त्यांच्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. महत्त्वाच्या सामन्यांत भारताने पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्याची सरासरी ६० ते ७० टक्क्यांपर्यंत उंचावली पाहिजे.’’

‘‘भारतीय संघातील अनेक युवा खेळाडूंनी त्यांच्या लैकिकास साजेसा खेळ केला नाही, असे मला वाटते. मात्र संघाची कामगिरी उत्तम होती. बचावफळीने विशेषत: सर्वाना प्रभावित केले, पण दुर्दैवाने उपांत्यपूर्व फेरीचा अडथळा ओलांडण्यात आपण अपयशी ठरलो. त्यामुळे माझ्या मते तरी आपण विश्वचषक गमावलाच,’’ असेही तिर्की म्हणाले. याव्यतिरिक्त युवा खेळाडूंचा भरणा असूनदेखील बलाढय़ बेल्जियमला २-२ असे बरोबरीत रोखणे भारतासाठी स्पर्धेतील सर्वोत्तम क्षण होता, असे तिर्की यांनी नमूद केले.

हरेंद्र सिंग हे सर्वोत्तम प्रशिक्षक!

तिर्की यांनी प्रशिक्षक हरेंद्र सिंग यांच्या कामगिरीचीसुद्धा प्रशंसा केली असून ते भारताला लाभलेले सर्वोत्तम प्रशिक्षक आहेत, असे तिर्की म्हणाले. ‘‘हरेंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने चॅम्पियन्स करंडकात उपविजेतेपद मिळवले, तर विश्वचषकातदेखील समाधानकारक कामगिरी केली. हरेंद्र यांच्यामुळे प्रशिक्षणाचा स्तर उंचावला असून यासाठी त्यांचे कौतुक केलेच पाहिजे,’’ असे तिर्की म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button