breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

जागतिक आरोग्य संघटना चीनची चौकशी करणार

जीनीव्हा | जागतिक आरोग्य संघटना कोरोना प्रकरणी चीनची चौकशी करणार आहे. अमेरिकेच्या प्रचंड दबावाखाली अखेर जागतिक आरोग्य संघटनेने चीनच्या चौकशीच्या ठरावाला मंजुरी दिली. कोरोना संकटामुळे पहिल्यांदाच व्हिडीओ कॉन्फरन्स पद्धतीने जागतिक आरोग्य संघटनेची परिषद झाली. या ७३व्या परिषदेत कोरोना या एकाच मुद्यावर सर्व देशांनी चर्चा केली. चर्चेअंती कोरोना प्रकरणी चीनची स्वतंत्र समितीमार्फत चौकशी करण्याच्या ठरावाला मंजुरी देण्यात आली.

https://twitter.com/realDonaldTrump/status/1262577580718395393

चीनमध्ये कोरोना संकट कशा प्रकारे आणि नेमके कोणत्या भागातून सुरू झाले, चीनने या संदर्भातली माहिती जागतिक आरोग्य संघटनेला कधी दिली, चीनने दिलेल्या माहितीचे स्वरुप आणि प्रत्यक्षातली स्थिती यात काही तफावत होती का; अशा अनेक प्रश्नांची उत्तरं चौकशीतून मिळतील, असा विश्वास परिषदेत व्यक्त करण्यात आला. जगाला कोरोनाचा उगम कळला तर त्याच्यावर मात करण्याचा उपाय शोधणे सोपे होईल, असाही विश्वास जागतिक आरोग्य संघटनेचे सदस्य असलेल्या अनेक देशांनी व्यक्त केला. चौकशीच्या ठरावाला मंजुरी मिळाल्यानंतर अमेरिका आणि युरोपियन युनियनने निर्णयाचे स्वागत केले. चौकशी लवकरच सुरू होईल, या संदर्भातले निर्णय योग्यवेळी घेतले जातील, असे जागतिक आरोग्य संघटनेचे सरचिटणीस टेड्रोस अदनोम घेब्रेयसस (Tedros Adhanom Ghebreyesus) यांनी सांगितले.

याआधी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या सरचिटणीसांना एक पत्र पाठवले. या पत्रातून ट्रम्प यांनी संघटनेवर चीनच्या हातचे बाहुले झाल्याची टीका केली. संघटनेला सर्वाधिक देणगी अमेरिकेकडून दिली जाते. पण कोरोना प्रकरणी माहिती देताना संघटनेने अमेरिकेचीच दिशाभूल केली, असा घणाघाती आरोप ट्रम्प यांनी केला. त्यांनी कोरोना प्रकरणी चीन आणि जागतिक आरोग्य संघटनेवर जोरदार टीका केली. जागतिक आरोग्य संघटना एखाद्या देशाच्या हातचे खेळणे बनू नये यासाठी संघटनेच्या रचनेत तातडीने आमुलाग्र बदल करण्याची आवश्यकता आहे. या संदर्भात अमेरिका संघटनेच्या प्रतिनिधींशी चर्चा करत आहे, असेही ट्रम्प यांनी नमूद केले. ट्रम्प आक्रमक झाले असताना रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी वेगळी भूमिका मांडली. संघटनेच्या रचनेत सुधारणा करण्याच्या प्रयत्नात सदस्य देशांमध्ये फूट पडू नये यासाठी खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे मत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी व्यक्त केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button