breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

जम्बो कोविड सेंटरच्या गलथान कारभारामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेची बदनामी – पक्षनेते नामदेव ढाके

  • पालकमंत्री अजित पवार यांचा निष्क्रिय कारभार चव्हाट्यावर
  • शासन आणि ठेकेदार यांच्यात समन्वयाचा अभाव

पिंपरी \ महाईन्यूज

जम्बो कोविड रुग्णालय व्यवस्थापनाच्या गलथान कारभारामुळे कर्मचा-यांना रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. कर्मचा-यांना वेतन न देता त्यांच्या तोंडाला पाणे पुसण्याचा उद्योग ठेकेदाराने केला आहे. यातून रुग्णालयावर नियंत्रण असलेले पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्य सरकारची निष्क्रियता समोर आली आहे. राज्य सरकार आणि ‘पीएमआरडीए’ यांच्या दुहेरी कामकाजात पिंपरी-चिंचवड महापालिकेची नाहक बदनामी होत असल्याचा आरोप पक्षनेते नामदेव ढाके यांनी केला आहे.

पुणे जिल्ह्यातुन कोरोना विषाणू हद्दपार करण्यासाठी व कोविड-१९ रुग्णांवर उपचार करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आण्णासाहेब मगर स्टेडीयम येथे जम्बो रुग्णालयाची उभारणी केली. या ठिकाणी पिंपरी-चिंचवड शहर व जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील कोरोना रुग्णांवर उपचार होत आहेत. जम्बो रुग्णालयाचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी उद्घाटन केले. उद्घाटनप्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सुचविल्याप्रमाणे पिंपरी-चिंचवड महापालिकेने या रुग्णालयासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला. ऑक्सीजन, आवश्यक औषधे, गोळ्या त्याचप्रमाणे सर्व भौतिक सुविधाही उपलब्ध करुन दिल्या. त्याचप्रमाणे या रुग्णालयावर नियंत्रणासाठी महापालिकेचे डॉक्टर व अधिकारीसुध्दा नियुक्त केले.

इतक्या सुविधा पिंपरी-चिंचवड महापालिकेने उपलब्ध करुन देवून सुध्दा जम्बो रुग्णालयात भोंगळ कारभार सुरू आहे. शासन व ठेकेदार यांच्यातील समन्वयाचा अभाव असल्यामुळे कोविड काळात आपल्या जिवाची पर्वा न करता रुग्णसेवा करणाऱ्या या रुग्णालयातील नर्स व इतर स्टाफ यांना पगार दिला नाही. त्यांना कोणतीही पुर्वसुचना न देता कामावरुन कमी केले. त्यांच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. कोट्यवधीचा खर्च करुन सुध्दा कर्मचाऱ्यांचा पगार दिला नाही. या प्रकारास सर्वस्वी पालकमंत्री व शासन जबाबदार असून शासन व ठेकेदार यांच्या भोंगळ कारभारामुळे जम्बो रुग्णालयाचे वाभाडे निघाले आहेत. वास्तविक पाहता या रुग्णालयाच्या निविदेचे काम पीएमआरडीएकडून करण्यात आले. ठेकेदाराला निविदा दिलेली आहे. त्यात शासन व पीएमआरडीएचे लक्ष नसल्यामुळे कर्मचाऱ्यांना नेमके कोणी उघड्यावर सोडले आहे, याचे गुपित उघड झाले पाहिजे, असेही ढाके यांनी म्हटले आहे.

मुळात महापालिकेच्या क्षेत्रातील कोविड रुग्णांबरोबरच हद्दीबाहेरील व ग्रामीण भागातील ४० % रुग्णांवर मनपामार्फत उपचार केले आहेत. तसे पाहिले तर ही जबाबदारी राज्य शासनाची आहे. असे असताना सुध्दा मानवतेच्या दृष्टीकोनोतून मनपा ग्रामीण भागातील नागरिकांना सेवा देत आहे. तसे पाहता जिल्ह्याची कोरोना रुग्णांची परिस्थिती लक्षात घेवुन महापालिकेने शासनाला वारंवार सहकार्य केले आहे. त्यामुळे शासनाने महापालिकेचा झालेला अधिकचा खर्च देवुन सहकार्य करणे अपेक्षित आहे. असा निधी देणे दुरच मात्र जम्बो रुग्णालयातील ठेकेदार व प्रशासनाच्या या भोंगळ कारभारामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेची नाहक बदनामी होत आहे, असा आरोप ढाके यांनी केला आहे.

या भोंगळ कारभाराबाबत तसेच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या पगाराविषयी व सुविधांचा अभाव यासंदर्भात महापौर उषा ढोरे, स्थायी समिती चेअरमन संतोष लोंढे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी आज जम्बो रुग्णालयाची समक्ष पाहणी करुन माहीती घेतली. त्यावेळी कर्मचाऱ्यांना तातडीने पगार देणेबाबतच्या सुचना त्यांनी जम्बो रुग्णालयाच्या व्यवस्थापनास केल्या. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button