breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

जगप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या चंद्रपुरातील तीन वाघांच्या मृत्यूचं गूढ अखेर उकललं

चंद्रपूर: जगप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेवर असलेल्या सितारामपेठ गावशेजारी मृत्यू झालेल्या 3 वाघांच्या मृत्यूचं गूढ अखेर उकललं आहे परिसरातील कोंडेगावच्या 3 ग्रामस्थांनी विषप्रयोग करुन या वाघांना मारल्याचं स्पष्ट झालेलं आहे. गावाशेजारी मोह फुलाच्या अवैध दारुचा अड्डा होता. ही वाघीण आणि तिचे बछडे या अड्ड्यापाशी सतत येत असल्याने अडसर झाला. यातूनच आरोपींनी वाघीण आणि तिच्या बछड्यांवर विषप्रयोग करुन त्यांची हत्या केल्याचं तपासात निष्पन्न झालेलं आहे.

फेब्रुवारीपासून विदर्भातील जंगलात मोह फुलांचा हंगाम सुरु होतो. त्यासोबतच दारु गाळण्याचे अवैध अड्डे देखील जंगलात सुरु होतात. यंदा दारुबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात कठोर लॉकडाऊनमुळे देशी-विदेशी दारुची तस्करी कमी झाली. त्यामुळे स्थानिक मोह फुलाच्या दारुची मागणी वाढली. अशातच कोंडेगाव तलाव परिसरात आरोपींनी तयार केलेल्या मोह फुलाच्या दारु अड्ड्यापाशी ही वाघीण रोज येत असे. त्यामुळे परिसरात चांगलीच दहशत तयार झाली होती. त्याचा अवैध दारुच्या अड्ड्याला फटका बसला. त्यातूनच आरोपींनी वाघीण आणि तिच्या बछड्यांचा काटा काढण्याचा कट रचला. हा भाग UUL मुक्त करण्याच्या उद्देशाने तिन्ही आरोपींनी मृत रानडुकरावर विषारी पावडर टाकून ठेवली. वाघीण आणि बछड्यांनी हेच रानडुक्कर खाल्ल्याने विषबाधा होऊन त्यांचा मृत्यू झाला.

वाघिणीचा मृतदेह 10 जून रोजी, तर बछड्यांचा मृतदेह 14 जून रोजी वनविभागाच्या गस्ती दरम्यान आढळला होता. दरम्यान व्हिसेराचे नमुने हैदराबादच्या प्रयोगशाळेत पाठवल्यानंतर विषप्रयोग झाला असल्याचे स्पष्ट झाले होते. वनविभागाने वेगवेगळी तपास पथके तयार करुन आरोपींचा कसून शोध चालवला होता. यात कोंडेगाव येथील 3 आरोपींनी हा विषप्रयोग केल्याचे निष्पन्न झाले आहे. सूर्यभान ठाकरे, श्र5वण मडावी, नरेंद्र दडमल अशी आरोपींची नावे आहेत. आज वनविभाग या आरोपींना भद्रावती येथील न्यायालयासमोर उभे करुन वन कोठडी घेणार आहे, अशी माहिती ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प क्षेत्र संचालक एन आर प्रवीण यांनी दिली आहे.

अवैध दारु अड्ड्याला अडसर होणाऱ्या वाघीण आणि तिच्या बछड्यांवर विषप्रयोग झाल्याने वनप्रेमींनी काळजी व्यक्त केली आहे. तसेच वन्य प्राण्यांच्या सुरक्षेचाही प्रश्न उपस्थित केला आहे. चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेवर 3 वाघांचे कुजलेले मृतदेह सापडल्याने वनप्रेमींनी गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. आता या प्रकरणाचा छडा लागल्यानंतर आरोपींविरोधात कठोर कारवाईची मागणी होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button