breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

जगताप समर्थकांचा आडमुठेपणा; महापालिकेत राष्ट्रवादी, शिवसेना अन् लांडगे समर्थकांची ‘युती’?

  • स्थायी समितीत जगताप समर्थकांची हुल्लडबाजी
  • आयुक्त, शिवसेना की लांडगे नेमका विरोध कुणाला? 

पिंपरी / विशेष प्रतिनिधी

पिंपरी- चिंचवड महापालिकेत चिंचवड विधानसभा मतदार संघाचे आमदार लक्ष्मण जगताप समर्थक सदस्यांच्या आडमुठेपणामुळे स्थायी समिती सभेमध्ये विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना आणि भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे समर्थक सदस्यांमध्ये ‘युती’ झाल्याचे पहायला मिळाले. विकासकामांच्या मुद्यावरून पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अधिकारी आणि सत्ताधारी भाजपा नगरसेवकांमध्ये समन्वयाचा अभाव आहे. अधिका-यांच्या दुटप्पी भूमिकेमुळे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या समर्थक नगरसेवकांनी स्थायी समितीच्या सभेत एखाद्या विषयाला प्रखर विरोध केल्यानंतर विकासकामांचा विषय मार्गी लावण्यासाठी राष्ट्रवादी, शिवसेना आणि आमदार महेश लांडगे समर्थक नगरसेवकांच्या एकजुटीचे दर्शन घडत आहे. 

नुकत्याच पार पडलेल्या शिक्षक आणि पदवीधर निवडणूक आचारसंहितेच्या मार्गदर्शक तत्वानुसार गेल्या महिन्यात स्थायीच्या सभा घेण्यास निर्बंध बसले. दरम्यान, आपात्कालीन परिस्थिती म्हणून कोरोना काळातील महत्वाचे निर्णय घेण्याची मुभा असावी, यासाठी स्थायीच्या सदस्यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे मध्यममार्ग काढण्यासाठी गळ घातली होती. त्यासाठी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि राज्य निवडणूक आयोगाकडे पालिका प्रशासनाने पत्रव्यवहार केला होता. मात्र, परवानगी न मिळाल्यामुळे स्थायीची सभा घेता आली नाही. त्यावर भाऊ समर्थक नगरसेवकांनी आयुक्तांवर आगपाखड केली. यापूर्वीही जगताप समर्थकांनी वारंवार स्थायीच्या विषयावरून आयुक्त श्रावण हर्डीकर आणि सभापती संतोष लोंढे यांना ‘टार्गेट’ केले आहे. दुसरीकडे, शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांच्या वाकड- ताथवडे प्रभागातील रस्त्याच्या कामांवरुन आमदार जगताप आणि नगरसेवक कलाटे यांच्यात वाद आहे. कलाटेंना विरोध करण्यासाठी जगताप समर्थक नगरसेवक स्थायीत वेगळा अजेंडा राबवीत आहेत.

आयुक्तांच्या खांद्यावर बंदुक, निशाणा लांडगेंवर ? 

यापूर्वी ताथवडे गावातील विकास कामांवरून जगताप समर्थक नगरसेवकांनी आयुक्त हर्डिकर यांच्यावर राज्य सरकारला चुकीची माहिती कळविल्याचा आरोप केला होता. त्यांनी आयुक्तांकडे याचा खुलासादेखील मागितला होता. तेव्हापासून आयुक्त स्थायी समितीच्या प्रत्येक सभेत जगताप समर्थकांच्या रडावर कायम राहिले आहेत. आजच्या सभेत ‘एफडीआर’च्या विषयाचा आयुक्तांना खुलासा मागण्यात आला होता. त्यावर आयुक्तांनी खुलासा दिला नाही. त्यांची बाजू घेऊन सभापती लोंढे यांनी मध्यस्ती केल्यामुळे जगताप समर्थक सभापतींवरदेखील घसरले. त्यांनी सभेत चांगलाच राडा घातला. सभा तहकूब करण्यास सभापतींना भाग पाडले. लांडगे समर्थक नगरसेवकांनी राहुल कलाटे यांच्या प्रभागातील विकासकामांबाबत अनुकूल भूमिका घेतल्याच्या राग जगताप समर्थकांना आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त आणि सभापतींच्या खांद्यावर बंदुक ठेवून आमदार महेश लांडगेंवर निशाणा साधत आहेत का? अशी चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे.

जगताप समर्थकांची हेकेखोरी लांडगेंच्या ‘पथ्यावर’

चिंचवडच्या विकासकामांच्या बाबतीत आयुक्त हर्डिकर यांची भूमिका योग्य नसल्याचा आरोप जगताप समर्थकांकडून केला जातो. त्यामुळे आयुक्त सध्या टिकेचे धनी होत आहेत. एफडीआरचा खुलासा करण्यात कमी पडल्यामुळे आयुक्तांवर रोष व्यक्त करत भाऊ समर्थकांनी आज सभेत गोंधळ घातला. त्यामुळे विकास कामाचा विषय मार्गी लावण्यासाठी राष्ट्रवादीच्या ताकदीवर सभापती निर्णय घेत असल्याचा आरोप गेला गेला. एकंदरीत, जगताप समर्थकांच्या अशा उद्विग्न भूमिकेमुळे स्थायीच्या सभागृहात राष्ट्रवादी, शिवसेना आणि लांडगे समर्थक नगरसेवकांच्या युतीचे दर्शन घडले आहे. जगताप समर्थकांच्या हेकेखोरीमुळे लांडगे गटाला राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे पाठबळ मिळत असल्याने लांडगे गटाचे फावले जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button