breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रराजकारण

छत्रपती उदयनराजे भोसले महाराज आपल्याबद्दल आदर पण….शिवसैनिकाचे खुले पत्र (वाचा जसेच्या तसे)

पुणे | महाईन्यूज | प्रतिनिधी

‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या वादग्रस्त पुस्तकावरून भाजप विरुद्ध सर्व विरोधी पक्ष असा वाद रंगला आहे. या वादात छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आणि भाजप नेते माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी उडी घेतली. उदयनराजे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना आणि राष्ट्रवादीला लक्ष केले. त्यामुळे या वादात आणखी ठिणगी पडली. उदयनराजे यांनी पत्रकारांशी बोलताना शिवसेनाबाबत काही प्रश्न उपस्थित केले. त्यावरून नाराज झालेल्या एका सशिवसैनिकाने उदयनराजे यांना पत्र लिहिले आहे. ‘सोशल मीडिया’वर हे पत्र व्हायरल होत आहे.

प्रति,
माननीय शिवश्री उदयनराजे महाराज भोसले यांना एका शिवसैनिकाचे जाहीर पत्र

यांस सविनय जय महाराष्ट्र

महोदय,
उदयनराजे भोसले महाराज. सर्वात प्रथम आपणास सांगू इच्छितो की,आम्ही हिंदू-मराठी व्यक्ती म्हणून राजे आपला नेहमी आदर करतो आणि यापुढेही करत राहू. पण महाराज आपली काल पत्रकार परिषद पाहिली. आपण पत्रकार परिषदेत मांडलेल्या मुद्द्यावर सरळ म्हणायचे तर खटकलेल्या मुद्द्यावर व्यक्त व्हावे वाटले म्हणून लिहण्याचे बेत.
आपण कालच्या पत्रकार परिषदेत अनेक मुद्दे मांडले.अगदी बऱ्याच मुद्द्यावर सविस्तर म्हणणे मांडून पत्रकारांना प्रदीर्घ मुलाखतच दिली. पण हे मुद्दे आम्ही याआधीच भाजप आयटी सेल पुरस्कृत सोशल मीडियावर आम्ही नेहमीच वाचत असतो त्यात आम्हाला नवल काही वाटले नाही. उलट खंत वाटली की,आपण मुख्य विषयावर कमी आणि शिवसेना-राष्ट्रवादी आणि इतर नको त्या विषयावर जास्त म्हणणे मांडले.
आपले मुद्दे आणि त्यावर थोडक्यात दिलेले माझे स्पष्टीकरण…
१) आपण म्हणलात दादर येथील शिवसेना भवनावर बाळासाहेबांचा फोटो वर आणि छत्रपती शिवाजी महाराज खाली का ?
तर याचे उत्तर असे की एक लक्षात घ्या, शिवसेना भवनावर बाळासाहेबांचा फोटो हा फक्त पेंटींग करून काढलेला असुन शिवाजी महाराजांचे फोटो नसून ती एक मुर्ती आहे शिवमंदीर आहे, स्मारक आहे. शिवसेना भवन येथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्यात काहीही नवल वाटत नाही कारण ते सहज उभे राहून राजेंच्या स्मारकास मुजरा करतात. उदा. आपण जर मंदिरात गेल्यावर दोन मजली मंदिर असेल तर पहिल्या मजल्यावरच देवांची अथवा देवीची मूर्ती असते दुसऱ्या मजल्यावर नाही. अगदी तसेच बाळासाहेब ठाकरे यांचे दुसऱ्या मजल्यावर फक्त बॅनर/फोटो आहे आणि शिवाजी महाराज यांचे स्मारक/स्फुर्तीस्थळ हे पहिल्या मजल्यावर आहे हे आपण समजून घ्यावे. बरं हे सगळं बाजुला ठेवलं तरी आपण कदाचित विसरला असाल की आपण शिवसेनेचे आमदार होतात आणि शिवसेनेकडुन राज्यमंत्री देखील होतात तेव्हा का नाही तुम्ही याविषयी बोललात ? तेव्हा नाही का दिसलं हे ?

२) आपला दुसरा मुद्दा होता ‘जाणता राजा’ ही पदवी कुणाला सुद्धा देणे चूक आहे. मुळात विशेषण,पदवी यामध्ये आणि सरसकट तुलना करणे यात खुप मोठा फरक आहे. शिवाजी महाराज यांना अनेक उपाध्या अथवा गुणविशेषांनी संबोधले जायचे. जाणता राजा,क्षत्रियकुलावतंस,गो-ब्राह्मण प्रतिपालक, रणधुरंधर अशा शेकडो पदव्या/उपाध्या राजेंना विशेषण म्हणून वापरतो. यातील एखादी पदवी कोणास त्यांच्या कार्यामुळे दिली तर वावगे काय? पण एखादी उपाधी आणि सरसकट शिवाजी महाराज यांची तुलना करणे यात फरक आहे हे आपणास लक्षात आले नाही ? तसे तर आपल्याला सुद्धा राजे म्हटले जाते मग राजे ही पदवी आपणास दिली म्हणून आपणच चूक आहे असे म्हणाल का? कारण राजे ही उपाधी शिवाजी महाराज यांची आहे. बरं कालचा पत्रकार परिषदेचा मुख्य मुद्दा हा त्या पुस्तकाविषयी होता मग तुम्ही त्यावर बोलायचं सोडुन जाणता राजा याविषयी जास्त बोललात ?
३) तुम्ही पुढे म्हणलात की ‘शिववडापाव’ नाव किती योग्य? शिववडा हा एक अन्नपदार्थ आहे. व्यक्ती आपल्या आयुष्यात जी काही खटाटोप करतो जे काही कार्य करतो ते आपले पोट भरण्यासाठीच करत असतो. मग दिनदुबळे लोक,सर्वसामान्य लोक जर असे अन्न पदार्थ खाऊन आपले पोट भरतात आणि कित्येक मराठी लोकांना यामुळे रोजगार मिळाले आहे. त्यामुळे यात नेमके आपल्याला वाईट वाटण्यासारखे काय आहे. जर शिवाजी महाराजांच्या नावाने जर महाराष्ट्रातील जनतेचं पोट भरलं जात असेल तर त्यात गैर काय ?
उलट विडी-तंबाखू सारख्या ठिकाणी शिवाजी बिडी संभाजी बिडी असे राजेंचे नाव दिले जाते त्याविषयी आपण काही भूमिका घेतली का कधी?
४) तुम्ही म्हणलात शिवसेनेचे नाव ठेवतांना आम्हाला विचारले का? शिवसेनेचे नाव ठाकरे सेना ठेवा.
आता काय शिवाजी महाराजांचे नाव घेताना किंवा कुठे वापरताना आपली परवानगी घ्यायची का? आणि हो शिवसेना नाव लावले आणि शिवसेनेने ते त्यांच्या कार्यातून सार्थकी देखील लावले आहे.आपल्याला त्यातील काही कार्य सांगतो.
जगात सर्वाधिक अॅम्ब्युलन्स ह्या शिवसेना ह्याच सामाजिक संघटनेच्या आहेत. शिवसेना पक्षाकडून अनेक ग्रंथालय सुरू आहे ज्याच्या माध्यमातून अनेक अधिकारी घडतात. भारतात सर्वात जास्त रक्तदान शिबिर करणारी आणि त्यामाध्यमातून सर्वात जास्त रक्त जमा करणारी एकमेव शिवसेना सामाजिक संघटना आहे. शिवसेनेचा प्रत्येक कार्यक्रम हा शिवाजी महाराज यांचे पूजन केल्याशिवाय सुरू होत नाही. शिवसेना हा एकमेव पक्ष आहे ज्यांच्या पक्षाचा झेंडा हा निखळ भगवा आहे. शिवसेना हा एकमेव पक्ष आहे ज्या पक्षाच्या सभेत पक्षाच्या नेत्यांपेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा जास्त असतात. नाही तर इतर समाजाची लोक नाराज होतील म्हणून मतांच्या लांगुलचालनासाठी शिवरायांना डावलत आलेले अनेक पक्ष आहेत. अखंड भारतात एकमेव पक्ष आहे शिवसेना जे फक्त आणि फक्त प्रभु श्रीराम,शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा हीच निशाणी, ओळख म्हणून मिरवतात आणि पूजतात सुद्धा. आज आपल्या राज्यात शिवशाही बस सुरू आहेत त्यासाठी कोणी पुढाकार घेतला ? राजेंच्या नावाने जलयुक्त शिवार योजना कार्यान्वित आहे यासाठी कोणी पुढाकार घेतला ? शिवजयंती प्रत्येक शिवसेनेच्या शाखेत हिंदू सण म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. लिहत राहिलो तर मोठी लिस्ट होईल. पण शेवटी सांगायचे एवढेच आहे की शिवाजी महाराज यांचे नाव फक्त लावले नाही तर शिवसेनेने नाव सार्थकी सुद्धा करून दाखविले आहे.

आपला,

समस्त महाराष्ट्र शिवसैनिक.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button