breaking-newsताज्या घडामोडीलेख

स्वराज्याचे वारसदार छत्रपती संभाजी महाराज यांचा आज राज्याभिषेक दिन !

१६८० साली छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर शासनकर्त्याची जागा कोण घेणार हा प्रश्न उपस्थित झाला, तो प्रश्न कोणताही शासनकर्ता निधन पावल्यावर उपस्थित होतच असतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूसमयी संभाजी महाराज हे पन्हाळगडावर होते, संभाजी महाराजांना कैद करायच्या कटात सामील असणाऱ्या मंत्र्याना हंबीरराव मोहिते यांनी कैद केले आणि हा कट हाणून पाडला. विशेष बाब अशी की छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेका समयी संभाजी महाराजांना युवराज म्हणून घोषित करण्यात आले होते यावरून संभाजी महाराज हेच स्वराज्याचे वारस आहेत हे स्पष्ट होते.

संभाजी महाराज यांनी राज्याभिषेकाची कोणतीही घाई न करता प्रथम शत्रूच्या हल्यांचा विचार करता सुभेदार, हवालदार इत्यादी सर्व अधिकाऱ्यांना बोलावून स्वराज्यातील गडकिल्ले, त्यावरील शिबंदी आणि इतर व्यवस्था लावली. यासमयी संभाजी महाराज हे पूर्णतः राज्यकारभात लक्ष घातल असल्याच्या नोंदी आढळतात. पोर्तुगीज, इंग्रज यांच्याशी पत्रव्यवहार करताना दिसतात तर मुरगोडचा देसाईच्या तक्रारी सोडवत रयतेला धीर देण्याचे धोरण स्विकारतात.

संभाजी महाराज स्वराज्याची व इतर व्यवस्था लावून जून १६८० साली रायगडवर आल्यानंतर आपल्या मातांचे आणि बंधूचे सांत्वन केले, राज्यात स्थिरता आल्यावर संभाजी महाराजांनी २० जुलै १६८० साली मंचकरोहण केले. संभाजी महाराज हे रागीट किंवा क्रूर असा बोलबाला झाल्याचे दिसत नाही, उलट ते फार मेहनती व सावध आहेत. संभाजी महाराज समजूतदार आहेत. संभाजी महाराजांच्या चालू कारभारावरून ते निराळ्या वृत्ताचे आणि स्वभावाचे म्हणजे अधिक मवाळ, दयाळू आहेत अशा अनेक नोंदी विविध साधनात आपल्याला मिळतात.

छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे वर्णन बखरी आणि अनुपुराण या साधनात मिळते. १४, १५ व १६ जानेवारी १६८१ ( रौद्रनाम संवत्सर माघ शुद्ध ७, शके १६०२) यादिवशी संभाजी महाराजांचा विधियुक्त राज्याभिषेक झाला, याप्रसंगी आपल्या वडिलांचा वारसा पुढे चालवत त्यांनी अष्टप्रधान मंडळाची नेमणूक केली व संभाजी महाराज स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले. छत्रपती संभाजी महाराज यांनी कटात सामील असल्यामुळे कैद केलेल्या मंत्र्यांची सुटका केली आणि त्यांना राज्याभिषेका समयी विविध पदे देखील दिली यावरून छत्रपती संभाजी महाराजांच्या एका वेगळ्या पैलूवर दृष्टीक्षेप पडतो.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर स्वराज्यात कोणत्याही प्रकारचा गोंधळ निर्माण झालेला दिसत नाही, यावरून छत्रपती संभाजी महाराज यांची स्वराज्यनिष्ठा, कर्तव्यदक्षता तसेच नियोजन इत्यादी पैलू आपल्या समोर येतात..

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button