breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

चौरस आहार खर्चात 10 रुपयांची वाढ

मुंबई – आदिवासीबहुल जिल्ह्यात गर्भवती आणि स्तनदा मातांसाठी राबवल्या जाणाऱ्या चौरस आहार योजनेच्या खर्चात प्रती लाभार्थी 10 रूपयांची वाढ करण्यात आल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी गुरूवारी दिली. त्यामुळे लाभार्थ्यांच्या आहारावर आता 25 ऐवजी 35 रूपयांचा खर्च होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आदिवासी विकास विभागाच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या “भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार’ योजनेंतर्गत आदिवासी क्षेत्रातील गर्भवती महिला, स्तनदा माता तसेच सात महिने ते सहा वर्षे वयार्पंतच्या मुलांना आठवड्यातून चार दिवस चौरस आहार दिला जातो. एकवेळच्या आहारासाठी प्रती लाभार्थी 25 रूपये दिले जात होते. त्यात 10 रूपयांची वाढ करून आता आहारासाठी 35 रूपये दिले जातील.

चौरस आहारातील अन्न घटकांचे प्रमाण प्रती लाभार्थी 305 ग्रॅम ऐवजी 375 ग्रॅम इतके वाढविण्यात आले आहे. अमृत आहार योजनेतून लाभार्थीला एक अंडी अथवा दोन केवी खरेदी करता यावीत म्हणून आता 5 रूपयांऐवजी 6 रूपये देण्यात येतील. योजनेवर जिल्हा नियोजन मंडवाकडून दरवर्षी 170 कोटी रूपयांचा खर्च केला जातो. 14 हजार अंगणवाड्यांच्या माध्यमातून सरासरी 1 लाख 22 हजार महिला आणि 7 लाख बालकांना चौरस आहार दिला जातो, अशी माहिती सवरा यांनी दिली.

अंगणवाडी सेविकांचा मेहनता वाढवला 
अमृत आहार योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या अंगणवाडी सेविका तसेच मदतनीसांना आदिवासी विकास विभागाकडून दरमहा दिल्या जाणाऱ्या मानधनात दुप्पट वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार त्यांना आता 250 रूपयांऐवजी 500 रूपये मिळतील, असे विष्णू सवरा यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button