breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चोरीच्या वाहनांची विक्री करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

पिंपरी |महाईन्यूज|

जुन्या वाहनांचे चेसीस आणि क्रमांक वापरून चोरीच्या वाहनांची विक्री करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. वाहनचोरट्यांचा ३० किलोमीटर सिनेस्टाईल पाठलाग करून पकडण्यात आले. त्यांच्याकडून १३ महागड्या चारचाकींसह एक कोटी ३९ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने ही कारवाई केली.

मनजित जोगिंदरसिंग मारवा (वय ३३, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड, मूळ रा. नवी दिल्ली) आणि दीपक चमनलाल खन्ना (वय ४०, रा. नवी दिल्ली) यांना अटक केली असून त्यांना चार नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांना गाड्या विक्रीसाठी मदत केल्याप्रकरणी प्रतिक ऊर्फ नागेश छगन देशमुख (वय २८, रा. खोपोली, जि. रायगड) तसेच हारुण शरीफ शेख (वय ३९, रा. चिखली) यांना देखील अटक करण्यात आली. याप्रकरणी सुरवातीला चनप्रित हरविंदरपाल सिंह (वय ४३, रा. रावेत) याला अटक केली होती.

रावेत येथील एका गॅरेजवर पोलिसांनी २६ जानेवारी रोजी छापा टाकला होता. त्यावेळी चारचाकी गाड्या, गाड्यांचे सुट्टे पार्ट व अनेक इंजिन मिळून आले होते. या गाड्यांवर महाराष्ट्र पासिंगचा नंबर होता. परंतु या गाड्या पंजाब येथील असल्याचे निष्पन्न झाले. तसेच काही गाडीवरही असलेला नंबर खोटा असल्याचे आढळून आले होते. त्या वेळी आरोपी चनप्रित हरविंदरपाल सिंह याला अटक करण्यात आली होती. त्याने व त्याच्या साथीदारांनी या गाड्या चोरून आणून त्यांच्या चेसीस व इंजिन नंबरमध्ये फेरफार केल्याचे उघड झाले. आरोपी चनप्रित सिंह याच्याकडून महागड्या 12 गाड्या तसेच चारचाकीचे 15 इंजिन असा दोन कोटी 19 लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. आरोपीकडून त्यावेळी दिल्ली, पंजाब, हरियाणा व चंदीगड राज्यातील एकूण नऊ चारचाकी वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले होते.

आरोपी चनप्रित याचा साथीदार मनजित मारवा हा दिल्ली येथे पसार झाला होता. त्यामुळे पोलीस त्याच्या मागावर होते. आरोपी मारवा व त्याचा साथीदार दिल्ली येथून चोरीच्या गाड्या घेऊन मुंबई – पुण्याच्या दिशेने येत आहेत, अशी माहिती मिळाली होती. त्यामुळे वेगवेगळ्या टिम तयार करून मोशी, खेड, सुपा या टोलनाक्यांवर दोन दिवस व एक रात्र असा सापळा पोलिसांनी लावला. मोशी टोलनाका येथे टोलनाक्यावरील असलेली गर्दी पाहून पोलिसांचा संशय आल्याने आरोपी यांनी दोन्ही गाड्या वळवून पुन्हा नाशिक रोडने जाऊ लागले. त्यांचा सुमारे 30 किलोमीटर पाठलाग करून पोलिसांनी त्यांना सिनेस्टाइल पकडले.

आरोपी मारवा फरार असताना कोंढवा भागात गोडाऊन भाड्याने घेवून त्यामध्ये गॅरेज चालू करण्याच्या तयारीत होता. आरोपी मारवा हा इन्शुरंन्स कंपनीकडून अपघातात नुकसान झालेल्या चारचाकी गाड्या कागदपत्रासह विकत घ्यायचा. त्याच मॉडेलची व रंगाची चारचाकी गाडी पंजाब, हरीयाणा, चंदीगड तसेच दिल्ली या राज्यातून आरोपी दीपक खन्ना चोरी करून आणून मनजित मारवा याला देत असे. त्यानंतर त्या गाडीवर अँक्सीडेंन्ट झालेल्या गाडीचा चेसीस व इंजिन नंबर असलेला भाग लावुन गाडीची पुन्हा विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

आरोपी मनजित मारवा व दिपक खन्ना हे सराईत गुन्हेगार असुन आरोपी मनजित मारवा याच्याविरूध्द यासारखे दिल्ली, हरियाणा येथे एकुण 12 गुन्हे दाखल आहेत. तसेच आरोपी दिपक खन्ना याच्या विरुद्ध दिल्ली, हरीयाणा, पंजाब या ठिकाणी ३८ गुन्हे दाखल आहेत. दाखल गुन्ह्यांमध्ये आरोपी यांच्याकडून आतापर्यंत एकुण २५ महागड्या चारचाकी गाड्या व चारचाकी गाड्याचे १५ इंजिन असा एकुण तीन कोटी ५८ लाख रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सर्व गाड्या या दिल्ली, पंजाब, हरीयाणा, चंदीगड या राज्यातुन चोरून आणल्याचे निष्पन्न झाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button