breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आमदार चाबुकस्वारांना विजयाचा शिवधनुष्य डोईजड! युवासेनेची प्रचंड नाराजी

  • कार्यकर्त्यांना बळ न दिल्याने निर्माण झाली प्रचंड नाराजी
  • विधानसभा निवडणुकीत एकजुट बांधण्याचे समोर आव्हान

पिंपरी | महाईन्यूज | अमोल शित्रे

विद्यमान आमदार असल्याने शिवसेनेकडून एड. गौतम चाबुकस्वार यांना यावेळी पिंपरी मतदार संघाची उमेदवारी मिळाली. परंतु, गेल्या पाच वर्षात चाबुकस्वारांनी ना कार्यकर्ते सांभाळले, ना त्यांना भक्कम पाठींबा दिला. कारण, 2014 ची जी लाट होती, ती केव्हाच ओसरली असून यावेळी निव्वळ कार्यकर्त्यांच्या जोरावर निवडणुका अवलंबून आहेत. पाच वर्षात एकही कार्यकर्ता जोपासलेला नसताना पिंपरीचा विजय कसा खेचून आणणार हा खरा प्रश्न आहे. युवासेनेच्या मदतीशिवाय चाबुकस्वारांना विजयाचा शिवधनुष्य पेलणे अवघड होणार आहे, असा अंदाज काही शिवसैनिकांनी मांडला आहे.

2014 च्या विधानसभा निवडणुकीच्यावेळी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कॉंग्रेस नगरसेवक पदाचा राजीनामा देऊन एड. चाबुकस्वार यांनी शिवसेनेत एंट्री केली. त्यावेळी मोदी लाटेचा करिश्मा चालल्याने शिवसेनेच्या तिकीटावर ते निवडून आले. राज्यभरात असे अनेक आमदार या वातारणाचा फायदा घेत निवडून आले. परंतु, निवडून आल्यानंतर चाबुकस्वारांनी हातावर मोजण्याएवढे कार्यकर्ते असताना त्यांना बळ देणे आपेक्षीत होते. परंतु, त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे आता नेमकी त्यांची अडचण झाली आहे. ही निवडणूक कोणाच्या जोरावर लढणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. चाबुकस्वार यांच्यापेक्षा युवासेनेची ताकद शहरात चांगली रुजली आहे. युवासैनिक चाबुकस्वारांना किती मदत करणार हा खरा प्रश्न आहे.

युवासेना थेट आदित्य ठाकरे यांच्याशी निगडीत असल्यामुळे खासदार श्रीरंग बारणे अथवा आमदार चाबुकस्वार यांच्याशी त्यांचा सलोखा नसल्याचे चित्र दिसते. लोकसभा निवडणुकीत खासदार बारणे यांनी युवासेनेच्या जोरावर शहरातून मताधिक्य मिळविल्याचे शिवसैनिक सांगतात. परंतु, बारणे यांना जशी युवासेनेची मदत मिळाली तशी आमदार चाबुकस्वारांना मिळेल, असे वाटत नाही. कारण, आमदार चाबुकस्वार हे एकवेळ आमदार झाले आहेत. आता नवीन चेह-याला संधी देण्याची मागणी युवासैनिकांची होती. त्यांच्याकडून माजी नगरसेवक जितेंद्र नन्नावरे हा नवीन चेहरा समोर केला होता. शेवटी पक्षश्रेष्ठींनी त्यांना डावलून चाबुकस्वारांना उमेदवारी दिली. त्यामुळे युवासैनिक नाराज दिसत आहेत. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर चाबुकस्वारांना साध्या शुभेच्छा देताना सुध्दा हा युवासैनिक दिसत नाही. निवडणुकीत ते चाबुकस्वारांचे काम करतीलच असे त्यांच्या हालचालींवरून वाटत नाही. त्यामुळे युवासेनेच्या मदतीशिवाय पिंपरीच्या विजयाचा शिवधनुष्य चाबुकस्वारांना कसा पेलणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

युवासेनेकडे स्थानिक नेत्यांचे जाणिवपूर्वक दुर्लक्ष

युवासेनेची फळी शहरात मजबूत होत चालली आहे. लोकसभा निवडणुकीपासून युवासेना राजकारणात अॅक्टीव्ह आहे. वेगवेगळ्या मुद्यांवर त्यांनी प्रशासनाच्या विरोधात आंदोलने, उपोषणे केली आहे. त्यामुळे त्यांना प्रशासकीय कारवायांना सामोरे जावे लागले आहे. अनेकांवर फौजदारी गुन्हे देखील दाखल आहेत. वेशेष म्हणजे युवासेना मैदानात उतरल्यानंतर स्वतःला मातब्बर समाजणारा शिवसेनेचा एकही नेता अथवा पदाधिकारी त्यांच्या सोबत दिसत नाही. परवा, आरटीओ कार्यालयाकडून नागरिकांची होणारी पिळवणूक थांबविण्यासाठी युवासैनिकांनी पत्रकार परिषद घेतली. या परिषदेला खासदार, आमदारच काय तर शहराध्यक्ष, पदाधिकारी, नगरसेवक, गटनेता कोणीच उपस्थित नव्हते. अशा अवस्थेत कार्यकर्त्यांना कसे बळ मिळणार, अशी नाराजी काही शिवसैनिकांनी व्यक्त केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button