breaking-newsपिंपरी / चिंचवड

चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट आणि आरएसएसच्या वतीने ९ हजार गरीबांना जेवण

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

दररोज २० हजार चपात्या, २०० किलो डाळीचे वरण आणि ४०० किलो भात आणि भाजी देऊन पिंपळेगुरव येथील चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) पिंपरी-चिंचवडमधील सुमारे ९ हजार बेघर, बाहेरगावचे विद्यार्थी, तृतीयपंथी, स्थलांतरित कामगार तसेच हातावर पोट असणाऱ्यांचा सांभाळ करत आहे. गेल्या २२ दिवसांपासून अखंडपणे दररोज दोन वेळच्या जेवणासाठी १८ हजार अन्न पाकिटांचे मोफत वितरण करण्यात येत आहे. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मदतीने सुरू असलेली ही अन्नपूर्णा योजना लॉकडाऊनच्या काळात गरजूंना आपले पोट भरण्यासाठी मोठा आधार ठरली आहे. या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

कोरोनामुळे लॉकडाऊन जारी झाल्याने शिक्षणासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये आलेले बाहेरगावचे विद्यार्थी, बेघर नागरिक, स्थलांतरित कामगार, तृतीयपंथी आणि हातावर पोट असणाऱ्यांसमोर आता पोटाची भूक कशी भागवायची हा मोठा प्रश्न निर्माण झाला. या सर्वांच्या मदतीला पिंपळेगुरव येथील चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ धावून गेला आहे. या दोघांच्या माध्यमातून दररोज शहरातील सुमारे ९ हजार नागरिकांना दोन वेळचे जेवण दिले जात आहे. माणुसकीच्या दृष्टीकोनातून गेल्या २२ दिवसांपासून हा उपक्रम निरंतर सुरू आहे. या ९ हजार नागरिकांना दररोज दोन वेळच्या जेवणात वरण भात, भाजी आणि दोन चपातीचा समावेश असलेली अन्न पाकिटे पुरविली जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ मार्च रोजी लॉकडाऊन जाहीर केला, त्याच दिवसांपासून चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गरजूंना जेवणाची पाकिटे वितरित करण्यास सुरूवात केली.

सुरूवातीला ४०० ते ५०० लोकांपर्यंत ही मदत पोहोचविली जात होती. आती ही संख्या वाढून दररोज तब्बल ९ हजार व्यक्ती एवढी झाली आहे. या व्यक्तींना दररोज दोनवेळचे जेवण पुरविण्यासाठी दररोज ३०० किलो आटा, २०० किलो डाळीचे वरण, ४०० किलो भात आणि भाजी बनविली जाते. तयार झालेले अन्न १८ हजार पाकिटांमध्ये पॅक करून ते गरजूपयंत पोहोचविले जाते. ९ हजार व्यक्तींचे जेवण बनविण्यासाठी भाजपच्या नगरसेविका उषा मुंढे व त्यांच्या बचत गटांतील २५ महिला गेल्या २२ दिवसांपासून स्वयंस्फूर्तीने काम करत आहेत. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मदतीने सुरू असलेला हा उपक्रम उपाशी राहण्याची वेळ आलेल्या गोरगरीबांना दिलासा देणारी असल्याचे नगरसेविका उषा मुंढे यांनी सांगितले.

चांगली वितरण व्यवस्था आणि दानशूरांचे सहकार्य

पिंपरी-चिंचवडमधील ९ हजार नागरिकांपर्यंत दोनवेळच्या अन्न पाकिटांचे वितरण करण्याची व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना तसेच विविध भागातील आरएसएसचे स्वयंसेवक आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना प्रशासनाकडून पास मिळवून देण्यात आले आहेत. तसेच अनेक दानशूरांनीही या उपक्रमात सहभागी होऊन गरजूंपर्यंत जेवण पोहोचविण्याची जबाबदारी उचलली आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पूर्णपणे पालन करून गरजूपर्यंत अन्न पाकिटांचे वितरण केले जाते. कोरोनाला थोपविण्यासाठी आता लॉकडाऊनचा कालावधी आणखी वाढविण्यात आला आहे. लॉकडाऊन सुरू असेपर्यंत गरजूंना रोज जेवण पुरविण्यात येणार आहे. सक्षम असलेल्या लोकांनी कोरोनाच्या संकट काळात शक्य असल्यास गरीबांची मदत करावी, असे आवाहन नगरसेविका उषा मुंढे यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button