breaking-newsमनोरंजन

गलवान खोऱ्यातील भारतीय जवानांचा पराक्रम लवकरच मोठ्या पडद्यावर; अजय देवगणची घोषणा

मुंबई: गलवान खोऱ्यातील भारतीय जवानांनी गाजवलेल्या शौर्याची महती सांगण्यासाठी चित्रपटाची निर्मिती करणार असल्याची घोषणा अभिनेता अजय देवगण याने केली आहे. पूर्व लडाखमध्ये असणाऱ्या गलवान खोऱ्यात १४ आणि १५ जूनला भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये जोरदार धुमश्चक्री झाली होती. यावेळी चिनी सैनिकांची संख्या जास्त असूनही भारतीय जवानांनी अभूतपूर्व अशा शौर्याचे प्रदर्शन केले होते. मात्र, यावेळी २० भारतीय सैनिकांना वीरमरण आले होते. या घटनेमुळे सारा देश ढवळून निघाला होता. 

या पार्श्वभूमीवर अजय देवगण याने या घटनेवर आधारित चित्रपटाची निर्मिती करणार असल्याचे सांगितले. या चित्रपटाचे नाव काय असेल किंवा चित्रपटात कोणते कलाकार असतील, हे अद्याप निश्चित झालेले नाही. तसेच अजय देवगण स्वत: चित्रपटात काम करणार आहे का, याविषयीही कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. केवळ अजय देवगण फिल्म्स आणि सिलेक्ट मीडिया होल्डिंग एएलपी यांच्याकडून चित्रपटाची निर्मिती होणार असल्याचे निश्चित झाले आहे. 

गलवान खोऱ्यातील रक्तरंजित संघर्षानंतर सध्या भारत आणि चीन यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी लेहमध्ये दाखल झाले होते. यावेळी त्यांनी निमू लष्करी तळावरील जवानांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी भारतीय जवानांनी गलवान खोऱ्यात दाखवलेल्या शौर्याची तारीफ केली होती. तुमच्यामुळे आज प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानाने फुलून गेल्याचे मोदींनी म्हटले होते. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रुग्णालयात जाऊन गलवान खोऱ्यातील धुमश्चक्रीत जखमी झालेल्या जवानांची विचारपूसही केली होती. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button