breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोल्हापूरला कोरोनाचे दोन रुग्ण आढळल्याने जिल्हा प्रशासन हादरले

कोल्हापूर – संपूर्ण राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना आता त्यात कोल्हापूरचीही भर पडली आहे. कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती भाग असलेल्या भक्‍तीपूजानगर परिसरातील एका तरुणाचा अहवाल गुरुवारी रात्री पॉझिटिव्ह आला आहे. यासह मूळची पेठवडगाव येथील एका तरुणीलाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ही महिला मिरजेत उपचार घेत आहे. जिल्ह्यात कोरोनाचे दोन रुग्ण आढळल्याने जिल्हा प्रशासन हादरले आहे.

सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या लगतच्या जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळून आले. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यात आजअखेर सुदैवाने एकही रुग्ण आढळला नव्हता. मात्र, गुरुवारी रात्री दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाग्रस्तांच्या यादीत कोल्हापूरचाही समावेश झाला आहे.

कोल्हापुरातील मंगळवार पेठ, भक्‍तीपूजानगर येथील तरुणाला कोरोनाची लागण झाली आहे. पुण्याहून दि. 20 मार्च रोजी हा तरुण कोल्हापुरात आला होता. दि. 25 रोजी तो तपासणीसाठी सीपीआरमध्ये आला होता. यावेळी त्याला त्रास होत असल्याने आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करून घेतले होते. त्याचा स्वॅब तपासणीसाठी पुण्याच्या एनआयव्हीला पाठविण्यात आला. आज रात्री त्याचा अहवाल प्राप्त झाला. यामध्ये त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचे सीपीआर प्रशासनाने सांगितले.

पेठवडगाव येथील एक तरुणी इस्लामपूर (जि. सांगली) येथे नातेवाईकांकडे शिक्षणासाठी राहते. ही तरुणी ज्या नातेवाईकांकडे राहत होती, त्यांच्या कुटुंबातील काहींना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे या तरुणीलाही मिरज येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिचाही अहवाल आज सांयकाळी पॉझिटिव्ह आला आहे. ही तरुणी सांगली जिल्ह्यात उपचार घेत असली तरी ती मूळची पेठवडगावची असून रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी ती पेठवडगाव येथील आपल्या घरात एक दिवस राहण्यासाठी आली होती. तिच्या घरातील लोकांनाही संशयित म्हणून सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील दोघांना लागण झाल्याने प्रशासन हादरले आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची बाधा होऊ नये यासाठी प्रशासन विविध पातळीवर अक्षरश: झपाटून काम करत होते. लॉकडाऊन, संचारबंदी, जमामबंदीपासून विविध उपाययोजना राबविल्या जात होत्या. सर्व प्रकारची प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत होती. मात्र, या जिल्ह्यातील दोघा जणांना कोरोनाची लागण झाल्याने प्रशासनाने सर्वच यंत्रणेला आता अधिक सतर्कतेचे आदेश दिले आहेत.

शहराचा मध्यवर्ती भाग असलेल्या मंगळवार पेठेतील भक्‍तीपूजानगर परिसरात हा रुग्ण आढळल्याने प्रशासनाने या परिसरात तातडीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू केली आहे. या परिसरात क्लस्टर तयार करण्यात येणार असून बाधित रुग्ण दि. 20 पासून कोठे कोठे गेला, त्याच्या संपर्कांत कोण कोण आले. त्याच्या संपर्कांत असलेले त्याचे कुटुंबीय, तसेच अन्य नातेवाईक, मित्र परिवार आदींचीही तपासणी होणार आहे. यासह त्याच्या संपर्कात आलेल्यांच्या संपर्कात आणखी कोण कोण आले याचीही माहिती घेतली जात असून त्यांचीही तातडीने तपासणी केली जाणार आहे.

पेठवडगाव येथील तरूणी आपल्या घरी एक दिवसांसाठी आली होती. ती आपल्या कुटूंबियांच्या सानिध्यात दिवसभर होती. तिच्या कुटुबिंयांची पेठवडगाव येथे औषध विक्रीची दोन दुकाने आहेत. यामुळे संबधित तरूणीच्या कुटुबिंयाच्या संपर्कांत आलेल्या अन्य व्यक्‍ती, तसेच त्यांच्या दुकानात आलेले ग्राहक, त्या ग्राहकांच्या संपर्कात आलेल्या व्यक्‍ती अशी चक्राकार तपासणी करावी लागणार आहे. त्यानूसार प्रशासनाने यंत्रणा कार्यान्वित करून संपर्कांत आलेल्या लोकांचा शोध सुरू केला आहे

नागरिक आता तरी भानावर येणार का?

जिल्ह्यात अद्याप एकही रुग्ण आढळलेला नाही, अशी टिमकी वाजवत अनेक जण रस्त्यावर येत जिल्हा प्रशासनाच्या सुचना धुडाकवत होते. आज गुरूवारी रात्री पर्यंत शहरासह जिल्ह्यातही अनेक ठिकाणी असेच चित्र दिसत होते, आता कोल्हापुरातही दोन रुग्ण आढळले आहेत. एक रुग्ण तर शहराच्या मध्यभागी असणार्‍या भागात आढळून आला आहे. त्याच्या संपर्कांत आलेले किती, त्यांच्या संपर्कांत आलेले आणखी किती अशी ही चक्राकार परिस्थिती निर्माण होण्याची भिती आहे. यामुळे आता तरी हे नागरिक भानावर येणार का? स्वत:चा नसला तरी इतरांचा तरी हे विचार करणार का असा सवाल उपस्थित होत आहे. जिल्ह्यात संचारबंदी आहे. काही दिवस घरातच बसावे असे प्रशासन वारंवार सांगत आहे. तरीही घराबाहेर येऊन कट्ट्यावर बसणे, चर्चा करणे, गर्दी करणे असे प्रकार शहरात अनेक ठिकाणी सुरूच आहे. नागरिकांनीच आता दक्षता घ्यायला हवी.

34 पैकी 1 पॉझिटिव्ह, दोन रिजेक्टेड

सीपीआरमधून बुधवारी सर्वाधिक 34 स्वॉब तपासणीसाठी पाठवून दिले होते. त्यापैकी 31 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. एकाचा पॉझिटिव्ह आला. तर दोन स्वॉब रिजेक्ट करण्यात आले. हे स्वॉब आज पुन्हा पाठविण्यात येणार आहेत.आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी गुरुवारी रात्री उशीरा सीपीआर रुग्णालयाला भेट दिली व डॉक्टरांशी चर्चा करून माहिती घेतली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button