breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

डेटिंग अ‍ॅपवरून १६ युवकांना लुबाडणारी तरुणी पोलिसांच्या जाळ्यात

पिंपरी |महाईन्यूज|

बंबल, टिंडर अशा डेटिंग अ‍ॅपवरून युवकांना भेटायला बोलावून गुंगीचे औषध देऊन लुबाडणारी ‘बंबल-बी’ तरुणीला अटक करण्यात आली आहे. तिने १६ जणांना फसविल्याचे समोर आले असून तिच्याकडून सोन्याचे २८९ ग्रॅमचे दागिने व मोबाईल फोन असा १५ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पिंपरी-चिंचवडपोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने ही कारवाई केली.

सायली दवेंद्र काळे (वय २७, रा. साधू वासवानी रोड, पुणे) असे अटक केलेल्या आरोपी तरुणीचे नाव आहे. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणीने बंबल अ‍ॅपवरून ओळख करून रावेत येथील तरुणाला १० डिसेंबर २०२० रोजी भेटायला गेली. त्यावेळी त्याला गुंगीचे औषध दिले. त्यानंतर त्याच्याकडील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण एक लाख ८५ हजारांचा मुद्देमाल चाेरून पोबारा केला. तसेच चेन्नई येथून वाकड येथे आलेल्या एका युवकासोबत देखील १७ जानेवारी २०२१ रोजी असाच प्रकार घडला. चेन्नई येथील युवकाकडील सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा एकूण एक लाख ५० हजारांचा मुद्देमाल चोरी केला. याप्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी बंबल अ‍ॅपवर स्वत:चे खोटे प्रोफाईल तयार करून आरोपी तरुणीचे विविध प्रोफाईल शोधून काढले. तिला तिच्याच जाळ्यात अडकवण्यासाठी फ्रेंड रिक्वेस्ट पाठविल्या. त्यातील एक फ्रेंड रिक्वेस्ट तरुणीने स्वीकारली. त्यानंतर चॅटिंग करून भेटीची वेळ ठरविण्यात आली. भूमकर चाैक येथे २६ जानेवारी रोजी भेटायला आल्यानंतर तरुणीला ताब्यात घेण्यात आले.

आरोपी तरुणी ही डेटिंग अ‍ॅपवरून पुण्यातील नसलेल्या तरुणांना हेरून त्यांच्याशी ओळख करून त्यांना भेटायला बोलावत असे. लाॅजवर किंवा संबंधित तरुणाच्या घरी ती भेटायला जायची. त्यानंतर पेयामध्ये झोपेच्या गोळ्या टाकून देत असे. संबंधित तरुणाला गुंगी आल्यानंतर दागिने, रोख रक्कम घेऊन तरुणी पोबारा करायची. तसेच तरुणांचा मोबाईल फोन घेऊन त्यातील चॅटिंग डिलिट करून संबंधित डेटिंग अ‍ॅप डिअ‍ॅक्टीव्ह करून फोन तोडून कचऱ्यात टाकून देत होती. त्यावरील चॅटिंग गेल्या एक वर्षात पुणे व पिंपरी-चिंचवड शहर परिसरात एकूण १६ युवकांना फसवल्याचे निष्पन्न झाले.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहायक आयुक्त राजाराम पाटील, प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट चारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे, सहायक निरीक्षक अंबरिष देशमुख, सहायक उपनिरीक्षक धर्मराज आवटे, दादाभाऊ पवार, पोलीस कर्मचारी प्रवीण दळे, नारायण जाधव, संजय गवारे, अदिनाथ मिसाळ, रोहिदास आडे, तुषार शेटे, लक्ष्मण आढारी, मोहम्मद गाैस नदाफ, वासुदेव मुंडे, शावरसिद्ध पांढरे, प्रशांत सैद, सुनील गुट्टे, तुषार काळे, सुरेश जायभाये, अजिनाथ ओंबासे, धनाजी शिंदे, सुखदेव गावंडे, गोविंद चव्हाण, स्वाती रुपनवर, वैशाली चांदगुडे, सायबर सेलचे वरिष्ठ निरीक्षक संजय तुंगार, तसेच राजेंद्र शेटे, नागेश माळी, पोपट हुलगे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button