कोरोना महामारीत खाजगी रुग्णवाहिका मालकांकडून रुग्णांची लूट
पुणे |महाईन्यूज|
कोरोना महामारीच्या काळात कोरोनाबाधित रुग्णांना एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात येत आहे. यादरम्यान बऱ्याचदा रुग्णवाहिकाने मालकांकडून जास्तीचे पैसे आकारल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे.
पुण्यात कोरोनाबाधित रुग्णाला एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात नेण्यासाठी एका रुग्णवाहिकेने तब्बल 8 हजार रुपये भाडे आकारले आहे. 7 किमी अंतरासाठी नियमाप्रमाणे 900 रुपये भाडे अपेक्षित असताना रुग्णाकडून तब्बल 8 हजार रुपये भाडे आकारल्याने प्रादेशिक परिवहन विभागाने या विरोधात बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. मूळात ही रुग्णवाहिका नसून मोबाइल व्हॅन आहे आणि रुग्णाला ने-आण करण्याची परवानगी मोबाईल व्हॅनला नाही. त्यामुळे या मोबाइल व्हॅन मालकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या आरटीओ ऑफिसनं संबंधित मोबाइल व्हॅन जप्त केली आहे.