कोरोनामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बेल्जियम दौरा रद्द
नवी दिल्ली | कोरोना विषाणूच्या वेगाने होणाऱ्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बेल्जियम दौरा रद्द करण्यात आला आहे. भारत-युरोपियन संघाच्या शिखर बैठकीच्या निमित्ताने मोदी बेल्जियम दौऱ्यावर जाणार होते. या बैठकीची तारीख निश्चित करण्यात आली नव्हती.
मात्र कोरोनाच्या चिंताजनक वातावरणामुळे मोदींचा नियोजित असलेला दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार दिली. यासंदर्भात रवीश कुमार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
ते म्हणाले, भारत-युरोपियन संघाच्या शिखर बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार होते. दोन्ही देशाच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सध्याच्या परिस्थितीत दौरा टाळण्याचा सल्ला दिला. त्यामुळेच मोदींचा दौरा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. युरोपीय संघ आणि भारत यांच्यात चांगले संबंध आहेत. त्यांच्यासोबतच्या चर्चेनंतर हा निर्णय घेतला असून या दौऱ्यासंदर्भात नव्याने वेळापत्रकावर निश्चितच विचार केला जाईल. कोरोना विषाणूचा प्रभाव लवकर आटोक्यात यावा, अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.