कोरोनामुळे अखेर चीनमध्ये कुत्र्यांच्या मांस विक्रीवर बंदी
कोरोना विषाणूचे केंद्र ठरलेल्या चीनमध्ये श्वान म्हणजेच कुत्र्यांच्या मांस विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. कोरोना विषाणूच्या प्रकोपादरम्यान चीनने कुत्र्यांना पाळीव प्राण्याच्या श्रेणीत टाकले आहे. त्यामुळे त्याचे मांस खाण्याची परंपरा बंद करण्यात आली आहे. चीनमध्ये प्रत्येक वर्षी सुमारे एक कोटी कुत्रे मारुन त्याचे मांस भोजनात वापरले जाते.
कोरोना विषाणूबाबत सुरु असलेल्या चर्चांदरम्यान चीनच्या कृषी मंत्रालयाने हे पाऊल उचलले आहे. फक्त अधिकृत कारणांसाठीच श्वानाला पाळण्याची परवानगी मिळेल किंवा त्याचा व्यापार केला जाईल, असे मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, चीनच्या वुहान प्रांतात पशुंच्या मांसाची खुल्या बाजारात विक्री होते. या बाजारातूनच कोरोना विषाणूचा प्रसार झाल्याचे बोलले जाते.
कोरोना विषाणू कोणत्या जनावरामुळे आला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. जागतिक आरोग्य संघटनेनेही (डब्ल्यूएचओ) म्हटले आहे की, घरातील पाळीव प्राण्यांमुळे कोरोना विषाणूचे संक्रमण झाल्याचे आतापर्यंत समोर आलेले नाही. दरम्यान, सोशल मीडियावर अनेक पद्धतीच्या अफवा आहेत की, चीनमधील लोक जनावरांना मारुन खातात, त्यामुळेच हा विषाणू पसरला आहे. परंतु, अद्याप हे स्पष्ट झालेलं नाहीये…