breaking-newsआरोग्यताज्या घडामोडी

कोरोनाबाधित रुग्णाच्या शिंकेमधून तब्बल 8 मीटरपर्यंत विषाणू पसरू शकतो

कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. अमेरिकेपासून ते विकसनशील असलेल्या भारतालाही याचा मोठा फटका बसला आहे. प्रत्येकजण आपापल्या परीने या विषाणूविरोधात लढण्यासाठी विविध उपाययोजना अवलंबत आहे. कोरोना विषाणू कशामुळे पसरतो, तो होऊ नये म्हणून काय उपाय योजना आहेत. याची माहिती सरकार, प्रशासकीय यंत्रणा लोकांपर्यंत पोहोचवत आहे. या विषाणूचा सामना करण्यासाठी औषधांचा शोधही घेतला जात आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळण्यास सांगितले जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूपासून बचावासाठी काही निर्देशही जाहीर केले आहेत. पण हे निर्देशही पुरेसे नसल्याचे समोर येत आहे. जर्नल ऑफ अमेरिकन मेडिकल असोसिएशनने प्रसिद्ध केलेल्या शोधनिबंधातील दाव्यानुसार, कोरोनाबाधिताच्या शिंकेमधून तब्बल ८ मीटरपर्यंत विषाणू जाऊ शकतो. 

या संशोधनानुसार, जागतिक आरोग्य संघटना आणि अमेरिकन संस्थेने जे निर्देश दिले आहेत ते खोकला किंवा शिंक तसेच श्वसनाच्या प्रक्रियेतून निर्माण होणारे ‘गॅस क्लाऊड’ याबाबतचे निकष १९३०च्या दशकातील मॉडेलवर आधारित आहेत. संशोधक लिडिया बुरुइबा यांनी या संशोधनातून इशारा दिला आहे की, खोकला किंवा शिंक यातून निघणारे सूक्ष्म थेंब २३ ते २७ फूट किंवा ७-८ मीटरपर्यंत जाऊ शकतात. सध्याचे निर्देश हे या थेंबाच्या आकाराबाबत जे आकलन आहे, त्यावर आधारित आहे. यामुळे कोरोनासारख्या घातक रोगांवरील प्रभावी उपचारांवर याचा परिणाम होऊ शकतो.

दरम्यान, नव्या संशोधनात विषाणू ८ मीटरपर्यंत अंतर कापू शकतो, असा निष्कर्ष काढण्यात आल्याने आता जगभर या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगला अधिक महत्त्व देऊन सावधगिरी बाळगावी लागणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button