breaking-newsताज्या घडामोडीपुणे

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता ‘ससून रुग्णालयाबाबत राजेश टोपे यांची महत्वाची माहिती

‘ससून रुग्णालयामध्ये सध्या ४५० खाटांची क्षमता असून, कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता येत्या काही दिवसांत ही क्षमता ८५० खाटांपर्यंत वाढविण्यात येणार आहे. ससून रुग्णालयात ६०७ डॉक्टर, प्रोफेसर, तसेच निवासी डॉक्टर असून, त्यातील सर्वाधिक डॉक्टरांना करोनाच्या सेवेत घेण्यात येणार आहे,’ अशी महत्त्वाची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

पुण्यात कोरोना संसर्ग सुरू झाल्यापासून प्रथमच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ससून रुग्णालयातील सुविधेसंदर्भात प्रशासनाची बैठक घेतली. या बैठकीला रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, प्रशासन अधिकारी एस. चोक्कलिंगम, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे आदी उपस्थित होते. टोपे दोन दिवस पुणे दौऱ्यावर असून आज ते पुण्यातील जम्बो रुग्णालयांसह ऑक्सिजन प्रकल्पांना भेटी देणार आहेत. त्याशिवाय खासगी रुग्णालयांच्या विश्वस्तांसह प्रमुखांची बैठकही घेणार आहेत.

‘ससून रुग्णालयात सध्या ४५० खाटा उपलब्ध आहेत. त्यात आणखी चारशे खाटांची क्षमता वाढविण्यात येणार असून, त्यासाठी आणखी २१३ डॉक्टर हवे आहेत. डॉक्टरांना दोन ते सव्वादोन लाख रुपये मानधन देण्याची तयारी ठेवली आहे. परंतु, डॉक्टरांचा प्रतिसाद मिळत नाही,’ अशी खंत व्यक्त करून, त्यासाठी प्रक्रिया पुन्हा राबविण्याची तयारी टोपे यांनी दर्शविली.

‘खासगी रुग्णालयांमधील आयसीयू आणि व्हेंटिलेटरच्या ८० टक्के खाटा पाहिजेत. मात्र, अनेक खासगी रुग्णालये ५ ते १० टक्के खाटा देत आहेत. ऑक्सिजनविरहित खाटांचे आम्ही ऑक्सिजनसज्ज खाटांत रूपांतर करणार आहोत,’ असेही टोपे म्हणाले. ‘पुण्यात सर्वाधिक चाचण्या होत आहेत. चाचण्यांची संख्या वाढली की रुग्णसंख्येचा दरही अधिक वाढू शकतो, असे भाकीत त्यांनी वर्तविले. चाचण्या करताना ७० टक्के अँटिजेन, तर ३० टक्के आरटी-पीसीआर चाचण्या कराव्यात,’ असे त्यांनी सुचविले.

‘करोनाच्या चाचणीसाठी सिटीस्कॅनचा उपयोग केला जात आहे. त्याचे सध्या ७ ते १० हजार रुपयांपर्यंत दर आकारले जात आहेत. ते दर दोन हजारांपर्यंत आणण्याचा प्रयत्न आहे. त्याशिवाय प्लाझ्माच्या दरावरही आम्ही नियंत्रण आणणार आहोत. आम्हाला पायाभूत सुविधांऐवजी डॉक्टरांची कमतरता असल्याने सहा जिल्ह्यांमध्ये टेली आयसीयू हा प्रकल्प राबवित आहोत,’ असेही राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button