breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

कॉंग्रेस नेते राजेंद्र गावित यांच्या हाती “कमळ’

  • मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश : पालघरची उमेदवारी मिळण्याची शक्‍यता 

मुंबई – आगामी पोटनिवडणूकी आधीच कॉंग्रेसला राज्यात आणखी एक मोठा धक्का बसला आहे. आदिवासी समाजातील कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री राजेंद्र गावित यांनी कॉंग्रेसला हात दाखवित हाती कमळ घेतले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत त्यांनी मुंबईतील भाजप मुख्यालयात पक्षप्रवेश केला.
पालघरच्या जागेची उमेदवारी देण्यासाठी भाजपकडूनही राजेंद्र गावित यांचे नाव संसदीय बोर्डाकडे पाठवले जाणार आहे. त्यानंतर राजेंद्र गावित यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल, अशी माहिती रावसाहेब दानवे यांनी दिली.

त्यामुळे पालघर लोकसभा पोटनिवडणुक शिवसेना आणि भाजपमध्ये रंगण्याची शक्‍यता आहे. कारण, शिवसेनेकडून श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी देण्यात आली. वनगा यांनी आज शिवसेनेकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, चिंतामणराव वनगा यांच्या मुलालाच भाजपकडून तिकीट मिळणार होते. मात्र जे झाले तै दुर्दैवी आहे. पालघरची जागा भाजपची आहे. त्यामुळे शिवसेनेने माघार घ्यावी, आणि पाठिंबा द्यावा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पालघरमध्ये चिंतामणराव वनगा यांनी पक्ष वाढवला. त्यामुळे पालघरमध्ये भाजपने विजय मिळवला नाही, तर ती त्यांच्यासाठी श्रद्धांजली ठरणार नाही, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी ही जागा जिंकण्याचा निर्धारही व्यक्त केला.
राजेंद्र गावित हे आदिवासी समाजातील मोठा चेहरा आहेत. कॉंग्रेसमध्ये असताना ते आदिवासी विकास राज्यमंत्री होते. ते मूळचे नंदुरबारचे आहेत. पालघरमधून आमदार म्हणून निवडून आले होते.

2014 सालची लोकसभा निवडणूक कॉंग्रेसकडून लढले, मात्र पराभूत झाले. 2016 साली विधानसभा पोटनिवडणुकीतही त्यांचा पराभव झाला होता.

दरम्यान, भंडारा-गोंदिया लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवार लवकरच जाहीर केला जाईल, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर ही जागा रिक्त झाली आहे. नाना पटोले यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button