breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

‘मुंबई महानगर’चा नवा विकास आराखडा

लवकरच अंतिम स्वरूप, मुख्यमंत्र्यांची माहिती

मुंबई महानगर प्रदेशाचा नवीन प्रादेशिक  विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून त्याला लवकरच अंतिम स्वरूप देण्यात येईल. मेट्रोसारख्या वाहतूक प्रकल्पांमुळे दळणवळण सुरळीत होईल व त्यातून महानगर प्रदेशाचा सुनियोजित विकास होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी सांगितले.

महाराष्ट्र सरकार आणि प्रोजेक्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मुंबई २.० या परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी व वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत झाले. त्या वेळी मुख्यमंत्री बोलत होते. या परिषदेत निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत, प्राइस वॉटरहाऊस कूपरचे प्रमुख हजिम गलाल, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्यासह उद्योग जगतातील प्रमुख, कार्यकारी अधिकारी, शासकीय अधिकारी उपस्थित होते.

नवउद्यमांमध्ये (स्टार्टअप) देशात मुंबई अव्वल आहे. २५ टक्के नवउद्यम एकटय़ा मुंबईत असून दुसऱ्या क्रमांकावर बंगळूरु (१६ टक्के) आहे, तर दिल्लीत १२ टक्के नवउद्यम आहेत. मुंबईमध्ये वाणिज्यिक जागांची कमतरता आहे. पण, नव्या विकास आराखडय़ात यासाठी तरतूद केल्याने परवडणाऱ्या दरातील वाणिज्यिक जागा मिळण्यास मदत होणार आहे. मुंबई महानगर प्रदेशातील सुविधांमुळे २० फिनटेक, माहिती तंत्रज्ञान पार्क उभे राहणार आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नवी मुंबई व रायगड जिल्ह्य़ातील नैना भागामुळे मुंबई विस्तारत आहे. कल्याण येथे विकास केंद्र (ग्रोथ सेंटर) उभारण्यात येत असून त्यामुळे मोठय़ा प्रमाणात जमीन उपलब्ध होणार आहे. येत्या दोन-तीन महिन्यांत मुंबईत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्यात येणार असून ते पाणी समुद्रात सोडले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

शाहरुखकडून प्रश्न

अभिनेता शाहरुख खान याने मुंबईतील पायाभूत सुविधा, विकास प्रकल्प, बॉलीवूडच्या प्रश्नांसंबंधी मुख्यमंत्री फडणवीस यांची मुलाखत घेतली. मुंबईत जगातील मोठा चित्रपट उद्योग आहे. त्यासाठी तंत्रज्ञ घडवणारी संस्था मुंबईत उभारण्यासाठी फिल्म इंडस्ट्रीने ब्ल्यू प्रिंट तयार करावी. त्याला राज्य सरकार सहकार्य करेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. या वेळी शाहरुखने आपण शिक्षण क्षेत्रात काम करणार असल्याचे जाहीर केले.

..म्हणून मुंबईसाठी वॉर रूम

मेट्रो, शिवडी न्हावाशेवा ट्रान्स हार्बर लिंक रोड, आदी प्रकल्पांची कामे वेगाने सुरू आहेत. मुंबईसाठी वेगळा मुख्य कार्यकारी अधिकारी असावा ही कल्पना चांगली असली तरी लोकशाही व्यवस्थेमध्ये ती शक्य नव्हती. त्यामुळे आम्ही ‘वॉर रूम’ सुरू केली. या माध्यमातून विविध प्रकल्पांच्या कामावर लक्ष ठेवले जात आहे. अंमलबजावणीतील समस्यांवर उपाय शोधून हे प्रकल्प सुरू करण्यात येत आहेत, असे फडणवीस यांना स्पष्ट केले.

क्रूझ पर्यटनास संधी

मुंबईला लाभलेल्या समुद्र किनाऱ्यामुळे येथे आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक क्रूझ टर्मिनल तयार करण्यात येत आहे. येत्या काळात जलवाहतूक त्याचबरोबर क्रूझ पर्यटनास मोठय़ा प्रमाणात संधी उपलब्ध होणार आहे, असे नितीन गडकरी यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button