breaking-newsराष्ट्रिय

के. सिवान: शेतकऱ्याचा मुलगा ते ‘चांद्रयान-२’चे नेतृत्व करणारे इस्रो प्रमुख

संपूर्ण जगाचे लक्ष्य लागून राहिलेल्या ‘चांद्रयान-२’चे भारताने यशस्वी प्रक्षेपण केले. सोमवारी दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी श्रीहरीकोटा येथील तळावरुन चांद्रयान-२ अवकाशात झेपावले. जीएसएलव्हीएमके३-एम१ प्रक्षेपकाने चांद्रयान-२ ला पृथ्वीच्या कक्षेत सोडल्याचे जाहीर करताना मला आनंद होत आहे. भारताच्या चंद्रावरील ऐतिहासिक प्रवासाला सुरुवात झाली आहे अशा शब्दात इस्रोचे अध्यक्ष के. सिवान यांनी या मोहिमेचे वर्णन केले. ‘मागील सात दिवसांपासून आम्ही घरदार विसरुन या मोहिमेच्या कामात लागलो होतो, त्यामुळे ही मोहिम यशस्वी झाल्याचा विशेष आनंद आहे,’ असं सिवान यावेळी म्हणाले. तसेच ‘ऐतिहासिक प्रवासाची ही केवळ सुरुवात आहे. अज्ञात असलेल्या गोष्टी शोधून काढायच्या आहेत. आपले कार्य संपलेले नाही. आता आपण पुढच्या मोहिमेवर काम सुरु करणार आहोत. यावर्षी अनेक मोहिमा आहेत. हे ज्यांच्यामुळे शक्य झाले त्या सर्वांना माझा सलाम’, अशा शब्दांमध्ये सिवान यांनी आपला आनंद व्यक्त केला. पण ज्या सिवान यांच्या नेतृत्वाखाली इस्रोने थेट चंद्रावर भारताचा झेंड फडकवण्यासाठी ‘चांद्रयान-२’चे प्रक्षेपण केले त्या सिवान यांचा प्रवासही थक्क करणार आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेला, पालिकेच्या शाळेत तमिळ भाषेतून शिक्षण घेतलेला मुलगा इस्रोसारख्या प्रतिष्ठित संस्थेचा प्रमुख बनण्यापर्यंतच्या प्रवासावर टाकलेली ही नजर…

इस्रोचे अध्यक्षपद…

२०१८ साली जानेवारी महिन्यात भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रो या संस्थेची धुरा वर्षांत के. सिवान यांच्या हाती देण्यात आली आहे. त्या आधी म्हणजेच २०१७ मध्ये इस्रोने १०४ उपग्रह एकाच वेळी सोडण्याचा जो विक्रम केला होता त्यात सिवान यांचा सिंहाचा वाटा होता. विशेष म्हणजे ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक तयार करण्यातही त्यांचीच विशेष कामगिरी कारणीभूत ठरली, स्वदेशी क्रायोजेनिक इंजिने विकसित करण्यातही त्यांचा मोठा वाटा आहे, त्यामुळेच ते ‘रॉकेट मॅन’ म्हणून ओळखले जातात.

शिक्षण…

इस्रोचे प्रमुख होण्याच्या आधी ते तिरुअनंतपूरम येथील विक्रम साराभाई अवकाश केंद्राचे संचालक म्हणून काम करीत होते. भारताचा सर्वात शक्तिशाली असा जीएसएलव्ही (भूस्थिर उपग्रह प्रक्षेपक) तयार करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. सिवान यांनी इस्रोच्या अग्निबाणांच्या मार्गाचे सादृश्यीकरण करणाऱ्या सितारा या सॉफ्टवेअरची निर्मिती केली. फेरवापराच्या अवकाश प्रक्षेपकांची अतिशय आव्हानात्मक योजनाही त्यांच्याच प्रयत्नांमुळे पार पाडता आली. १९८० मध्ये ते हवाई अभियांत्रिकी विषयात मद्रास इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतून पदवीधर झाले. नंतर त्याच विषयात आयआयएस्सी संस्थेतून पदव्युत्तर पदवी घेऊन, २००६ मध्ये मुंबई आयआयटीतून पीएचडी झाले.

शेतकरी कुटुंबातून इस्रोपर्यंतचा प्रवास…

नागरकॉइलसारख्या ग्रामीण भागातून पुढे आलेल्या सिवान यांना सुरुवातीच्या काळात अनेक आर्थिक अडचणी आल्या. सुरुवातीला त्यांना एस.टी. हिंदू कॉलेजात गणिताची निवड करावी लागली होती. गणितात ते हुशार होते. इतर चार विषयांतही शंभर टक्के गुण मिळाल्याने त्यांना शिष्यवृत्ती मिळाली. त्यातून त्यांना मद्रास इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या नामांकित संस्थेत प्रवेश मिळू शकला. सिवान यांच्या शिक्षणासाठी त्यांच्या वडिलांना शेत जमिनीचा तुकडा विकण्याची वेळ आली. मिसाइल मॅन ए.पी.जे. अब्दुल कलाम ज्या मद्रास इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) या संस्थेचे माजी विद्यार्थी होते त्याच संस्थेत सिवान शिकले. कलाम हे चौथ्या बॅचचे विद्यार्थी होते तर सिवान हे २९ व्या बॅचचे विद्यार्थी होते. म्हणजेच कलाम यांच्यानंतर बरोबरच २५ वर्षांनी तेच विषय घेऊन सिवान यांनी एमआयटीमध्ये प्रवेश घेतला होता.

१९८२ मध्ये सिवान इस्रोत काम करू लागले. त्यानंतर ३६ वर्षांनी त्यांना इस्रोच्या प्रमुखपदाचा मान मिळाला. कन्याकुमारी जिल्ह्य़ातील तरक्कनाविलाय या छोटय़ा गावात शेतकरी कुटुंबात जन्मलेला, पालिकेच्या शाळेत तमिळ भाषेतून शिक्षण घेतलेला मुलगा इस्रोसारख्या प्रतिष्ठित संस्थेचा प्रमुख बनला. मेहनत व अभ्यासाच्या जोरावर फाडफाड इंग्लिशच्या जमान्यात तमिळ भाषेचे बोट धरून ते सर्वोच्च पदावर पोहोचले यातून बराच बोध घेण्यासारखा आहे.

पुरस्कार…

सत्यभामा विद्यापीठाची मानद डॉक्टरेट, विक्रम साराभाई पुरस्कार, बिरेन रॉय अवकाश विज्ञान पुरस्कार असे अनेक मानसन्मान सिवान यांना मिळाले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button