breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

किल्लारी भूकंप ; काही घरात दिवा लावायला माणूसही शिल्लक राहिला नव्हता

किल्लारी ( वैभव बालकुंदे ) – 30 सप्टेंबर 2018 रोजी किल्लारीच्या महाप्रलयंकारी भूकंपला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. भूकंप होऊन 25 वर्षे उलटली असली तरी किल्लारी आणि परिसर त्या धक्क्यातून म्हणावा तितका सावरलेला नाही. गेल्या 25 वर्षात छोटे मोठे असे अनेक भूकंपाचे धक्के या भागाला बसत असतात… पण दगड मातीची कच्ची घरं माघे पडून पुनर्वसनात मिळालेल्या पक्क्या घरांमुळे अलिकडल्या धक्क्यात मोठी हानी होत नाही.  30 सप्टेंबर 1993 रोजी मध्यरात्री झालेल्या भूकंपात अनेक नांदती गावेच्या गावे जमिनीखाली गाडली गेली कित्येक स्वप्न डोक्यात घेऊन जगणारी माणसं मातीच्या ढिगाऱ्याखाली गाढली गेली होती. या भूकंपात तब्बल 7 हजार 928 लोक मृत्युमुखी पडले होते. काही घरात तर दिवा लावण्यास माणूसही शिल्लक राहिला नव्हता.
या भूकंपाचे केंद्र हे किल्लारीजवळ एकोंडी या गावात होते. भूकंपानंतर एकोंडी गावाजवळ असलेल्या नदीत एक मोठी भेग पडली होती ती भेग नंतर कितीतरी दिवस पाहायला मिळत होती. पहाटे तीन वाजून छप्पन मिनिटांनी झालेल्या या भूकंपात लातूर आणि उस्मानाबाद या दोन जिल्ह्यातल्या उमरगा आणि औसा या दोन तालुक्यातील तब्बल 52 गावांना विनाशकारी फटका बसला होता. या भूकंपात जितकी माणसं मेली होती त्याच्या दुप्पट म्हणजे 15854 इतक्या मोठ्या संख्येने जनावरांचा बळी गेला होता. रिस्टर स्केलवर 6.04 इतकी तीव्रता मोजल्या गेलेल्या या भूकंपात तब्बल 30 हजार घर जमीनदोस्त झाली होती तर 13 जिल्ह्यातल्या तब्बल 2 लाख 11 हजार घरांना तडे गेले होते. या प्रलंयकरी भूकंपानंतर प्रशासनासमोर सर्वात मोठं आव्हान होतं ते या परिसरातील 52 गावचं पुनर्वसन करणे आणि जे लोक जिवंत राहिले आहेत त्यांना मानसिक आधार देणे. त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या शरद पवार यांनी हे काम चोख बजावलं अस आजही अनेक अभ्यासक आणि प्रशासनातील अधिकारी सांगत असतात. शरद पवार मुख्यमंत्री असताना लातूरला प्रविणसिंह परदेशी हे जिल्हाधिकारी होते. त्याकाळात प्रविणसिंह परदेशी हे अनेक दिवस किल्लारीतच ठाण मांडून बसत असत त्यामुळेही किल्लारी आणि परिसर लवकर सावरू शकला असं सांगितलं जातं. 
    भूकंपाचा प्रत्यक्ष साक्षीदार असलेले भूकंपग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष अमर बिराजदार सांगत होते की, “भूकंप झाला तेंव्हा मी 14 वर्षांचा होतो किल्लारीपासून 8 किलोमीटर अंतरावर असलेलं मंगरूळ हे माझं गाव, पण त्या रात्री मी माझ्या मामाच्या गावी माडजला गेलो होतो. तिथे आम्ही वाड्यात मोकळ्या जागेत झोपलो होतो रात्री भुकंप झाला तेंव्हा आम्ही दचकून उठलो होतो माडजलाही भूकंप झाला होता घरं पडली होती पण तेवढं नुकसान झालं नव्हतं नंतर उशिराने बातमी आली की किल्लारी आणि मंगरुळला मोठा भूकंप झालाय आणि सगळी घरं पडली आहेत. सकाळी खूप लवकर आमच्या मामांनी बैलगाडी जुंपली आणि साडेआठ पर्यंत आम्ही मंगरुळला पोचलो. गावात पोचलो तर गाव कुठे आहे कसं आहे काहीच कळत नव्हतं सगळं भुईसपाट झालं होतं. आम्ही कसंतरी आमचं घर शोधून काढलो घरात आई वडील आणि आज्जी अडकली होती. आम्ही कितीतरी वेळ घराच्या ढिगाऱ्याहून फिरत होतो आम्हाला काहीच कळत नव्हतं… टिकाव फावड असं काहीच सोबत नव्हतं घर दगड माती आणि माळवदाचं होतं. माळवद भुईसपाट झालं होतं त्यामुळे घरातले लोक जगण्याची काहीच शक्यता नव्हती. शेवटी आम्ही उंचवट्याच्या जागेवरून दगड माती बाजूला करायला सुरुवात केली थोडा अंतर खोदला असेल नसेल तोच आतून आई आणि वडिलांचं जोरजोरात ओरडण्याचा आवाज येऊ लागला मग आम्ही सगळ्या आवाजाच्या दिशेने माती उपसली तर मध्ये आई वडील आणि आज्जी जखमी अवस्थेत पडलेले होते. घराचं माळवद भिंतीवर तिरपं कोसळलं होतं त्यामुळे आई वडील आणि आज्जी वाचली होती त्यानंतर अंबेजोगाईच्या दवाखान्यात तब्बल दोन महिने  आई आणि वडिलांवर उपचार सुरू होते. त्यावेळी माझ्या अडीच हजार लोकसंख्येच्या गावात तब्बल 750 लोक मृत्युमुखी पडले होते. त्यातले 12 कुटुंब असे होते की त्यांच्या घरात नाव सांगायला सुद्धा कुणी शिल्लक राहिलेलं नाही. माझ्याच गावात मृतदेहाच्या आशा रांगाच रांग लागलेल्या पहिल्या आहेत. आजही ते दिवस आठवले की अंगावर काटा येतो. हा भूकंप झाल्यानंतर त्यावेळचे मुख्यमंत्री शरद पवार आणि आणि जिल्हाधिकारी प्रविणसिंह परदेशी हे गावात तळ ठोकून उभे होते.
आज आमच्या 52 गावांमध्ये सगळ्यांचं पुनर्वसन झालं आहे. त्यावेळेला काही संस्थानी सुद्धा आमच्या परिसराला मदत केली. त्यात भारतीय जैन संघटना आहे. KATA ही संस्था आहे शिवसेनेने सुद्धा आमच्या भागात एका गावचे पुनर्वसन केलं आहे. भारतीय जैन संघटनेने आमच्या भागातील तब्बल बाराशे मुलं पुण्याला शिकायला नेली त्यात मी सुद्धा एक होतो. जैन संघटनेमुळे माझ्यासह अनेक भूकंपग्रस्त मुले शिकू शकली. त्यावेळी भूकंपग्रस्तांना आरक्षण सुद्धा देण्यात आलं पण त्याची नीट अंमलबजावणी होत नव्हती. शेवटी मी शिक्षण घेऊन जैन संघटनेतून बाहेर पडल्यानंतर 2005 साली भूकंपग्रस्त कृती समिती स्थापन केली. सुदैवाने त्यावेळी मुख्यमंत्री विलासराव देशमुख होते त्यांच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिला आणि संपूर्ण राज्यभर भूकंपग्रस्तांसाठी 2 टक्के आरक्षण लागू झालं आज आमच्या भागातले जवळपास तीन हजार कर्मचारी नोकरीला आहेत. भूकंपाच्या 25 वर्षानंतर आज पुन्हा किल्लारीत अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. मुळात नवीन वसवलेल्या गावात अंतर्गत रस्ते आणि गटारे यांची नंतरच्या काळात चांगली सोया झालेली नाही त्यासाठी आम्ही झटत आहोत. आमच्या नव्याने पुनर्वसन झाल्यामुळे गावाच्या वाहिवाटी बदलल्या आहेत. आम्हला आमच्या शेतात जाण्यासाठी खूप लांबचा अंतर कापावा लागतो. त्यासाठी रस्ते नीट नाहीत शेत रस्ते, गाव रस्ते, पानंद रस्ते यांची नव्याने आखणी होणं गरजेचं आहे. यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. सर्वात महत्वाचं म्हणजे अशी भीषण आपत्ती पुन्हा येऊ शकते. त्यासाठी सर्वांनी सजग आणि तयार असलं पाहिजे पण आज प्रशासन मात्र त्याबाबत बेफिकिर वाटत आहे.
   आज 25 वर्षानंतर शासकीय यंत्रणा या आपत्तीबाबत बेफिकीर वाटत असली तरी 1993 साली प्रशासकीय यंत्रणेने मात्र अतुलनीय कामगिरी केली होती. किल्लारीत हा भूकंप झाल्यानंतर मुख्यमंत्री शरद पवार हे तातडीने अर्थात सकाळी 9 वाजता किल्लारीत पोचले होते. पण भूकंप झाल्यानंतर पहाटेच त्यावेळचे लातूरचे जिल्हाधिकारी असलेले प्रविणसिंह परदेशी हे किल्लारीत दाखल झाले होते. त्यानंतर कित्येक तरी महिने प्रविणसिंह परदेशी यांनी या भागात ठाण मांडून पुनर्वसन करून घेतलं होतं.
याबाबत सांगताना प्रविणसिंह परदेशी सांगत होते की, ” लातूर उस्मानाबाद आणि संपूर्ण मराठवाड्यात दगड आणि मातीची घरं बांधण्याची प्रथा आहे. ही घरं मोठी मोठी दगड भिंतीत घालून त्याला ओबडधोबड लिंपन करतात. किल्लारीत जेंव्हा भूकंप झाला तेंव्हा ही अशी सगळी घरं पहिल्याच धक्क्यात पडली होती. त्यामुळे हजारो लोक मृत्युमुखी पडले होते. जेंव्हा घर पडतं तेंव्हा तो निव्वळ एक चिखल मातीचा डोलारा कोसळत नाही. तर त्यात शेतकऱ्यांची गुरं ढोर, शेतीतून आलेलं उत्पन्न, खाण्यापिण्याचे पधार्थ, शेतीची अवजारे आणि विशेष म्हणजे एका कुटुंबाचा स्वावलंबी संसार त्यात संपतो. आम्ही जेंव्हा पुनर्वसन करायला सुरुवात केली तेंव्हा आमच्या समोर निव्वळ घरं बांधणं हा मुद्दाच नव्हता तर आम्हाला त्या भागातल्या प्रत्येक स्वावलंबीपणे उभं करणं हा जास्त महत्वाचा मुद्दा होता. भूकंप झाल्यानंतर तर पहिली आठ दिवस आम्ही वाचलेल्या लोकांना फक्त तयार केलेलं अन्न पुरवू शकत होतो. त्यात जोराचा पाऊस येत होता. त्यामुळे अपत्तीग्रस्त लोकांना जास्त काळ उघड्यावर ठेऊ शकत नव्हतो. त्यामुळे आम्ही त्यावेळी पत्र्याचे शेड्स उभे करण्याचा निर्णय घेतला. आणि निव्वळ एका महिन्यात तब्बल 50 हजार शेड्स आम्ही उभे केले आणि लोकांना तात्पुरता निवारा उभा करून दिला. आणि त्यानंतर आम्ही भूकंप रोधक टेक्निक वापरून परिसरातल्या 52 गावांच्या पुनर्वसनाला सुरुवात केली. यात मोठा शेतकरी असेल त्याला मोठं घर त्यानंतर छोटं असं तीन टप्प्यात वर्गवारी करून आम्ही घरं ऍलोट केली होती. पण हे करत असताना आम्ही कुणालाही अडीचशे स्क्वेअर फुटाच्या खाली घर आणि दीड हजार स्क्वेअर फुटापेक्षा कमी प्लॉट दिला नाही. खरंतर ज्या काळात ही घटना घडली त्यावेळी आपल्या देशाची आणि राज्याची अशी स्थिती नव्हती की इतकं मोठं पुनर्वसन आपण करू शकू पण सर्वांच्या मदतीमुळे ते पुनर्वसन होऊ शकलं आणि 52 अशी मोठीच्या मोठी गावे पुन्हा नव्याने वसवणे आणि त्यांना स्वावलंबी करणे आपल्याला शक्य झाले. हे पुनर्वसन इतकं पक्क आहे की आजही 7 रिस्टर स्केलचा भूकंप जरी आला तरी हे घरं पडणार नाहीत इतकी ही मजबूत पक्की आणि भूकंपरोधक बनवण्यात आली आहेत.
     प्रशासनाने जसं या भागाचं पुनर्वसन केलं तसं अनेक स्वयंसेवी संस्थानी या भागात मदतकार्य राबवून आपत्तीग्रस्त लोकांना मानसिक बळ देण्याचं मोठं काम केलं, या भूकंपात एकमेव राजकीय पक्षाने पुनर्वसन आणि मानसिक बळ देण्याचं काम केलं ते म्हणजे शिवसेनेने. शिवसेनेच्या वतीने दवलिंबाळा या गावचे पुनर्वसन करण्यात आले. याकामासाठी सध्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी घेतलेली मेहनत अतुलनीय आहे. त्याचबरोबर शिवसेनवच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी केलेलं कामंही खूप उल्लेखनीय आहे. या भूकंपात ज्या घरात फक्त महिलाच उरल्या आहेत आशा महिलांना आणि इतर मानसिक धक्का बसलेल्या महिलांना आधार देण्यासाठी नीलम गोऱ्हे यांनी स्त्री आधार केंद्राची स्थापना करून महिलांना मानसिक बळ दिलं आहे. आजही या भागात नीलम गोऱ्हे यांच्या स्त्री आधार केंद्राचं काम सुरू आहे.
याबाबत नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, ” जेंव्हा भूकंप झाला तेंव्हा आम्ही महिला आयोगाच्या कार्यक्रमासाठी नागपुरला निघालो होतो. पण जशी भूकंपाची बातमी समजली तसे आम्ही आमच्या गाड्या नागपूरला वळवल्या, किल्लारीत तेंव्हा भीषण परिस्थिती होती. कुठल्या गावचा पेशंट कुठल्या रुग्णालयात आहे आणि नातेवाईक कुठे आहेत याबाबत कुणालाच काही कळत नव्हतं, तेंव्हा आम्ही सर्वात पहिल्यांदा जखमींची आणि त्यांच्या गावांची यादी केली आणि जखमींच्या नातेवाईकांना माहिती द्यायला सुरुवात केली. प्रत्यक्षात जेंव्हा भूकंपग्रस्तांना मदत मिळायला सुरुवात झाली तेंव्हा ट्रक भरून मदत यायची. पण धडधाकट लोक धावत येऊन मदत मिळवायचे पण ज्या महिला ज्यांच्या कडेवर मूल आहे त्यांना पळता येत नाही आशा महिलांची कुचंबना होऊ लागली त्यांना काही मिळेनासे झालं तेंव्हा आम्ही मदतीची पद्धत बदलून त्या महिलांपर्यंत मदत पोचवायला सुरुवात केली. खरंतर या भूकंपात सर्वांचंच मोठं नुकसान झालं होतं पण त्यात महिलांची अवस्था भीषण होती. ज्या घरात पुरुष शिल्लक राहिला नाही नुसत्या महिला होत्या किंवा फक्त लहान मुलीच जिवंत राहिल्या होत्या आशा घरचे प्रश्न गंभीर होते. आणि ते एका दिवसात सुटणार नव्हते परिणामी आम्ही किल्लारी आणि परिसरात कायमस्वरूपी काम करण्याचा निर्णय घेतला आणि स्त्री आधार केंद्राची स्थापना केली. या भूकंपानंतर ज्या मुली अनाथ झाल्या त्यांचे अनेक नातेवाईक आले त्यांनी मुलीला आम्ही सांभाळतो असं सांगितलं पण ते कसं सांभाळतील आणि त्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा असा प्रश्न होता.
तेव्हा जिल्हाधिकारी यांनी या मुलींच्या नातेवाईकांचा सर्वे करून या मुली कुणाकडे जास्त व्यवस्थित राहू शकतील याची माहिती द्यायला सांगितली त्यानुसार आम्ही तब्बल चारशे मुलींसाठी ही माहिती पुरवली आणि त्याबरोबर त्या मुली मोठ्या होईपर्यंत त्यांच्या संगोपणावर आम्ही लक्ष ठेऊन होतो. आज त्या मुली वेगवेगळ्या ठिकाणी नोकरीला आहेत. काही लग्न होऊन त्यांच्या घरी सुखाने नांदत आहेत. असाच प्रश्न विधवा महिलांच्या बाबतीत उपस्थित झाला होता. यात विधवा महिलांचे दुरदूरचे नातेवाईक यायचे आणि त्या महिलेची शेती आम्ही करतो असं सांगायचे पण आम्ही स्त्री आधार केंद्रातून या महिलांना स्वतःच शेती करण्यासाठी मदत करण्याचा निर्णय घेतला आणि त्या महिलेला आम्ही उभं केलं त्यामुळेही याभागातल्या असंख्य महिला सक्षम होऊ शकल्या. गावा गावात आम्ही संघटना उभी करून महिलांच्या सक्षमीकरनावर भर दिला आशा एकल आणि विधवा महिलांना ताकत देऊन खंबीरपणे त्यांच्या माघे उभे राहिलो त्यामुळे या भागात इतक्या भीषण अपत्तीनंतर महिला सक्षमपणे उभ्या राहिल्या आहेत.सामाजिक संघटना तथा संस्था आणि त्याचबरोबर प्रशासनाने सातत्याने केलेल्या प्रयत्नामुळे किल्लारीच्या अनेक प्रश्न सार्वकालिन सुटले आहेत. किल्लारीची अप्पती हे देशातली सर्वात मोठी आपत्ती होती. या अपत्तीनंतर प्रत्येक यंत्रणा ही प्रामाणिकपणे आपल्या ठिकाणी काम करण्यासाठी उभी राहिली म्हणून आज उभ्या राहिल्या किल्लारीचं आणि परिसराचं सुदृढ रुपडं आपल्याला पाहायला मिळतं. जगाला आदर्श देऊ शकेल असं सर्वंकष पुनर्वसन हे महाराष्ट्रात आणि मरातजवड्यात झालं ही नक्कीच अभिमानाची बाबा आहे…..
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button