breaking-newsराष्ट्रिय

कांदळवन क्षेत्रातील भरीव वाढीची ‘लिम्का बुक’मध्ये नोंद

लोकसहभागातून किती उत्कृष्टपणे काम करता येते याची प्रचिती वनखात्याने कांदळवन क्षेत्रातील कामाद्वारे दिली आहे. लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सने याची दखल घेत या कामावर उत्कृष्टतेची मोहोर उमटवली असून कांदळवन क्षेत्रात भरीव वाढ करणारे महाराष्ट्र हे देशातील प्रथम क्रमांकाचे राज्य ठरले आहे.

यापूर्वी २०१६ मध्ये दोन कोटी वृक्षलागवडीचा संकल्प दोन कोटी ८२ लाख वृक्ष लावून पूर्णत्वास नेण्यात आला होता. ज्याची नोंद लिम्का बुकमध्ये पहिल्यांदा घेतली गेली.

लोकसहभागातून २०१७ च्या पावसाळ्यात पाच कोटी ४३ लाख वृक्ष राज्यात लागले आणि या लक्षवेधी कामगिरीची दुसऱ्यांदा लिम्का बुक मध्ये नोंद झाली. आता कांदळवनातील स्वच्छतेच्या उपक्रमाने तिसरी नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सने केली आहे. फेब्रुवारी २०१९ मध्ये या नोंदीचे प्रमाणपत्र विभागाला दिले जाणार आहे.

कांदळवन कक्षाने ‘स्वच्छ कांदळवन अभियानाची’ अंमलबजावणी २०१५ मध्ये सुरु केली. या अंतर्गत मुंबई, नवी मुंबई, बांद्रा, वर्सोवा, दहिसर, शिवडी, ऐरोली, भांडूप, गोराई, वाशी अशा विविध ठिकाणच्या कांदळवनाची स्वच्छता करण्यात आली.

यामध्ये ११ कि.मी समुद्र आणि खाडी किनारी क्षेत्रातील आठ हजार टन कचऱ्याचे संकलन करण्यात आले. २५ हजार लोकांनी यात सहभाग घेतला आणि ‘शहरी वनक्षेत्र स्वच्छते’चे भारतातील सर्वात मोठे पाऊल या निमित्ताने पडले. वन विभागाच्या कामाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डने अशा पद्धतीने तिसऱ्यांदा नोंद घेतल्याने  विभागाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला.

लोकसहभागाचे यश

कांदळवन कक्ष,लोकसहभाग, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, स्थानिक नागरिक आणि स्वंयसेवी संस्थांच्या सहभागातून हा कार्यक्रम यशस्वी झाला. कांदळवन कक्षाबरोबर सामान्य मुंबईकर, स्वयंसेवी संस्था यांची यातील कामगिरी फार मोलाची आहे. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

असे आहे महाराष्ट्रातील कांदळवन क्षेत्र

भारतीय वनस्थिती अहवाल २०१५ नुसार, राज्याचे कांदळवन क्षेत्र २२२  चौ. कि.मी होते ते २०१७ मध्ये वाढून ३०४चौ.कि.मी इतके झाले आहे. यामध्ये ८२ चौ. कि.मी ची भरघोस वाढ नोंदवण्यात आली आहे. ही वाढ प्रामुख्याने रायगड, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यत आहे. कांदळवन क्षेत्रात अशी भरीव वाढ करणारं महाराष्ट्र हे देशातील प्रथम क्रमांकाचे राज्य ठरले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button