breaking-newsराष्ट्रिय

काँग्रेसकडे कल?

मतदानोत्तर चाचण्यांमध्ये राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगढमध्ये कौल; तेलंगणमध्ये टीआरएस

राजस्थान आणि तेलंगणातील मतदानानंतर शुक्रवारी पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया समाप्त झाली. मतदानोत्तर चाचण्यांमध्ये जनमताचा कल काँग्रेसच्या बाजूने असल्याचे दिसत आहे. विविध मतदानोत्तर कौलानुसार राजस्थानात काँग्रेसला एकहाती सत्ता मिळेल, तर मध्य प्रदेश आणि छत्तीसगढमध्ये भाजप आणि काँग्रेस तुल्यबळ ठरतील आणि सत्तास्थापनेसाठी दोघांना कंबर कसावी लागेल. त्यामुळे २०१९ची ‘लढाई’ अधिक रंगतदार होणार आहे.

या निवडणुकांची मतमोजणी मंगळवारी होणार असून त्याच दिवशी सर्व निकाल लागणार आहेत. या निवडणुकीपाठोपाठ सार्वत्रिक निवडणुकीसाठी सर्व पक्ष कामाला लागणार असल्याने या निवडणुकांत जनमताचा कौल कुठे झुकतो, याची उत्सुकता सर्वच पक्ष आणि राजकीय निरीक्षकांनाही आहे.

राजस्थानमध्ये काँग्रेसला निर्णायक बहुमत मिळेल, असे भाकित सर्वच चाचण्यांनी वर्तवले आहे. तर छत्तीसगढमध्ये काही चाचण्यांनी भाजपच्या तर काही चाचण्यांनी काँग्रेसच्या बाजूने कौल असल्याचे म्हटले आहे. तेलंगणमध्ये तेलंगण राष्ट्र समितीला (टीआरएस) बहुमत मिळेल, पण काँग्रेसची ताकदही लक्षणीयरित्या वाढण्याचे संकेत मतदानोत्तर चाचण्यांतून मिळत आहेत. तिथे काँग्रेस, तेलुगू देसम पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि जनसेना या पक्षांनी ‘पीपल्स फ्रन्ट’ स्थापून तेलंगण राष्ट्र समितीला जोरदार टक्कर दिली आहे. त्यामुळे ‘टीआरएस’च्या जागांमध्ये घट होण्याची चिन्हे आहेत. हे अंदाज खरे ठरले, तर मुदतीपूर्वीच सहा महिने विधानसभा विसर्जित करणारे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना या निकालाने निश्चितच धक्का बसणार आहे.

मध्य प्रदेशात गेली १५ वर्षे भाजपची सत्ता आहे. मात्र यंदा काँग्रेसने जबरदस्त आव्हान उभे केल्याचे मतदानोत्तर चाचण्यांतून दिसून आले आहे. टाइम्स नाऊ आणि सीनएक्स यांच्या अंदाजानुसार विधानसभेच्या २३० जागांपैकी भाजपला १२६ तर काँग्रेसला ८९ जागा मिळतील, असा अंदाज आहे. मात्र इतर काही मतदानोत्तर चाचण्यांनी सत्ताबदल होऊन भाजपच्या या प्रभाव क्षेत्रात काँग्रेस सत्तेत येईल असा अंदाज वर्तवला आहे. इंडिया टुडे-माय एक्सिसने मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला १०४ ते १२२ च्या दरम्यान तर भाजपला १०२ ते १२० जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला आहे.  एबीपी न्यूजने मध्य प्रदेशात १२६ जागांसह काँग्रेसचे सरकार येईल आणि भाजपला ९४ जागांवर समाधान मानावे लागेल, असे भाकित वर्तवले आहे. छत्तीसगढमध्येही चांगलीच चुरस असून, काँग्रेसला भाजपपेक्षा अधिक जागा मिळतील असे भाकित काही वाहिन्यांकडून वर्तविण्यात आले आहे.

राजस्थानात ७२ तर तेलंगणमध्ये ६७ टक्के मतदान

राजस्थान विधानसभेच्या १९९ जागांसाठी शुक्रवारी ७२.६२ टक्के मतदान झाले. बसप उमेदवाराच्या मृत्यूने एका जागेवर मतदान पुढे ढकलण्यात आले आहे. तर तेलंगणमध्ये ११९ जागांसाठी ६७ टक्के मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. या दोन राज्यांसह छत्तीसगढ, मध्य प्रदेश व मिझोराममध्ये मतमोजणी ११ डिसेंबरला होणार आहे.

मतदारांचा उत्तम प्रतिसाद

राजस्थान विधानसभेच्या १९९ जागांसाठी शुक्रवारी ७२.६२ टक्के मतदान झाले. बसप उमेदवाराच्या मृत्यूने एका जागेवर मतदान पुढे ढकलण्यात आले आहे. तर तेलंगणमध्ये ६७ टक्के मतदान झाले. या दोन राज्यांसह छत्तीसगढ, मध्य प्रदेश व मिझोराममध्ये मतमोजणी ११ डिसेंबरला होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button