breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

कर्नाटक पोटनिवडणुकीत काँग्रेसचा मोठा पराभव; १५ पैकी १२ जागा भाजपने जिंकल्या!

काँग्रेसचे विरोधी पक्षनेते सिद्धारामैया यांनी दिला राजीनामा

बंगळुरु। महाईन्यूज । ऑनलाईन टीम

कर्नाटक पोटनिवडणूक निकालामध्ये मोठा पराभव झाल्यानंतर विरोधी पक्षनेते सिद्धारामैया यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. जनतेने दिलेल्या या कौलाचा आम्ही स्वीकार करतो, मी माझा राजीनामा काँग्रेस अध्यक्षांना पाठवला आहे, असे ते म्हणाले. तर निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेसने मागच्या दाराने जनादेश चोरला होता. मात्र आता जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. झारखंडच्या बरहीमध्ये एका सभेला संबोधित करताना पीएम मोदी म्हणाले की, काही लोकं म्हणायचे की, दक्षिण भारतात भाजपचा प्रभाव कमी आहे. मात्र त्या लोकांना कर्नाटक पोटनिवडणुकीच्या निकालाने लोकशाही पद्धतीने धडा शिकवला आहे.

मोदी पुढे म्हणाले की, काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कर्नाटकात जनादेशाचे उल्लंघन केले आणि जनतेच्या पाठीत वार केला. आता या पक्षांना पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. कर्नाटकचा हा निकाल या लोकांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे, असेही मोदी म्हणाले.

कर्नाटकात विधानसभेच्या पोटनिवडणुकीत 15 पैकी 12 जागांवर भाजपने विजय मिळवला आहे. येडियुरप्पा सरकारला बहुमतासाठी 15 किमान सहा जागांवर विजय मिळवणं आवश्यक होतं. भाजपनं अखेर 12 जागांवर विजय मिळवत आपली सत्ता कायम ठेवण्यात यश मिळवलं आहे.

या 12 जागांवर विजय मिळाल्याने येदियुरप्पा सरकारला पूर्ण बहुमत मिळाले आहे. यामुळे विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस आणि जेडीएसला मोठा धक्का बसला आहे. आधी झालेल्या निवडणुकांमध्ये या 15 पैकी 12 जागांवर काँग्रेसने विजय मिळवला होता. मात्र या निवडणुकीत काँग्रेसला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे. तर जेडीएसला एकही जागा जिंकता आलेली नाही. या 15 पैकी तीन जागा जेडीएसने जिंकल्या होत्या.

कर्नाटकमध्ये 17 आमदारांच्या बंडामुळे काँग्रेस-जेडीएसचं सरकार पडलं होतं. या आमदारांनी राजीनामे देत या सरकारचा पाठिंबा काढून घेतला. या आमदारांना तत्कालीन विधानसभा अध्यक्षांनी अपात्र ठरवलं होते. आमदार अपात्र ठरल्याने रिक्त झालेल्या 15 मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक झाली होती.

कर्नाटक पोटनिवडणुकीत अठानी, कगवाड, गोकाक, येलापूर, हिरेकेरुर, रानीबेन्नूर, विजयनगर, चिकबेलापुर, के.आर. पुरम यशवंतपुरा, महालक्ष्मी ले आऊट, शिवाजीनगर, होसाकोटे, के.आर. पेटे, हुनसूर जागांवर मतदान झालं होतं.

कर्नाटकमध्ये 6 डिसेंबर रोजी 15 विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान झालं होतं. 61 टक्क्यांपेक्षा अधिक मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button