breaking-newsराष्ट्रिय

कर्नाटकात अटीतटी!

आणखी पाच आमदार सर्वोच्च न्यायालयात; काँग्रेसकडून नाराजांची मनधरणी

कर्नाटकातील राजकीय पेच सुटण्याऐवजी आणखीनच गुंतागुंतीचा बनला आहे. राज्यातील काँग्रेसच्या आणखी पाच बंडखोर आमदारांनी शनिवारी विधानसभा अध्यक्षांविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.  विधानसभेचे अध्यक्ष आपले राजीनामे स्वीकारत नसल्याने या आमदारांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने बंडखोरांची मनधरणी सुरूच ठेवली आहे. सरकारने सोमवारी विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जावे असे आव्हान भाजपने दिले आहे.

आनंद सिंह, के. सुधाकर, एन. नागराज, मुनिरत्ना आणि रोशन बेग  या पाच बंडखोर आमदारांनी शनिवारी विधानसभेचे अध्यक्ष राजीनामे स्वीकारत नसल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. यापूर्वी १० बंडखोर आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती त्यांच्यासमवेतच आमच्याबाबतचा निर्णय घ्यावा, अशी या पाच जणांनी विनंती केली आहे.

काँग्रेसकडून नाराजांची मनधरणी

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर कर्नाटकमधील राजकीय स्थिती मंगळवापर्यंत जैसे थे राहणार असल्याने बंडखोर आमदारांचे मन वळविण्याचा प्रयत्न करण्यासाठी आता काँग्रेस पक्ष सरसावला आहे. काँग्रेसच्या एका बंडखोर आमदाराने राजीनामा मागे घेण्याचे संकेत देऊन अन्य बंडखोर आमदारांचे मन वळविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केल्याने काँग्रेसच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. गृहनिर्माणमंत्री एमटीबी नागराज यांनी सांगितले की, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांनी आपली भेट घेऊन राजीनामा मागे घेण्यास सांगितले आहे. सिद्धरामय्या आणि दिनेश गुंडुराव यांनी आपल्याशी संपर्क साधला आणि राजीनामा मागे घेऊन पक्ष न सोडण्याची विनंती केली, यावर विचार करण्यासाठी आपण वेळ मागितला आहे, असे नागराज म्हणाले. चिक्कबल्लापुराचे आमदार सुधाकर यांच्याशी चर्चा करू आणि राजीनामा मागे घेण्यासाठी त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न करू, असे आपण सिद्धरामय्या आणि गुंडुराव यांना सांगितल्याचे नागराज यांनी येथे वार्ताहरांना सांगितले.

कर्नाटकमधील सत्तारूढ आघाडीचा पाठिंबा काढून भाजपच्या बाजूला वळणाऱ्या दोन अपक्ष आमदारांनी विधानसभेच्या अध्यक्षांना पत्र लिहून सभागृहात आपल्याला विरोधी पक्षांच्या बाकांवर आसन व्यवस्था उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे.

विश्वासदर्शक ठरावाचा भाजपचा आग्रह

कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी सोमवारी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडावा असा भाजपचा आग्रह असेल, असे ज्येष्ठ नेते बी. एस. येडियुरप्पा यांनी शनिवारी येथे स्पष्ट केले. कर्नाटकमधील सत्तारूढ काँग्रेस-जेडीएस आघाडी सरकारने बहुमत गमावले आहे आणि ते कोसळणार असल्याचे आता निश्चित आहे, असा दावा येडियुरप्पा यांनी केला आहे. सत्तारूढ आमदारांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे उद्भवलेला संभ्रम दूर व्हावा यासाठी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडण्याचे शुक्रवारी कुमारस्वामी यांनी जाहीर केले आणि विधानसभेच्या अध्यक्षांना त्यासाठीचा वेळ निश्चित करण्याची विनंती केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button