कर्नाटकचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना कोरोनाची लागण
बंगळुरु : कर्नाटक विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना कोरोनाची लागण झाली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार 71 वर्षीय सिद्धरामय्या यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्यापाठोपाठ विरोधीपक्ष नेत्यालाही कोरोनाचा संसर्ग झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
“माझी कोव्हिड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. खबरदारी म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने मला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना मी लक्षणे तपासण्याची आणि स्वत:ला अलग ठेवण्याची विनंती करतो” असे ट्वीट सिद्धरामय्या यांनी केले आहे.
सिद्धरामय्या यांना बंगळुरुच्या मणीपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून देखरेख ठेवली जात आहे. सिद्धरामय्या यांना कोणतीही लक्षणे दिसलेली नाहीत, अशी माहिती मणीपाल रुग्णालयाने निवेदनात दिली.