breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कठोर मेहनतीमुळेच आयुष्यात यश प्राप्ती होते – विश्वास नांगरे पाटील

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – लोकांच्या गरजा आणि प्रश्न समजून घेऊन पोलीस प्रशासनाने जनतेशी संवाद साधावा. गरजा ओळखून पोलिसिंग केले गेले, तर पोलीस व नागरिक यांच्यातील अंतर कमी होऊन वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालणे शक्‍य होईल. कठोर मेहनतीमुळेच आयुष्यात यश प्राप्त करता येते, असा कानमंत्र कोल्‍हापूर पोलीस परिमंडलचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी युवकांना चिंचवड येथे शनिवारी (दि. 12) दिला.

कर्तव्य फाऊंडेशनच्या वतीने राष्ट्रीय युवा दिनानिमित्त ‘मोरया युथ फेस्टिव्हल’चे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी ॲड. सचिन पटवर्धन, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर, नगरसेवक बाबू नायर, नगरसेविका अनुराधा गोरखे, कामगार नेते इरफान सय्यद, अमित गोरखे, भाजपचे पदाधिकारी, संयोजन समितीचे सदस्य उपस्थित होते. यावेळी पाणी बचतीवर संदेश देणारा ‘बंडाळ’ हा लघुपट उपस्थितांना दाखविण्यात आला. यावेळी ॲड. सचिन पटवर्धन, राहुल सोलापूरकर यांनी नांगरे पाटलांची प्रकट मुलाखत घेतली.

गावचा खविस ते दहशतवादी कसाबला पकडण्यापर्यंतचा प्रवास कसा झाला. या प्रश्नाला उत्तर देताना नांगरे पाटील म्‍हणाले, ग्रामीण भागातील भूत ही गावातील चर्चा असते. मला एकदा खोलीत रात्रभर कोंडून ठेवण्यात आले. मला खूप भीती वाटली. सकाळपर्यंत जीवंत राहू, का असा प्रश्न मनात आला. पण, दमलो असल्‍याने झोप लागली. दुस-या दिवशी सहिसलामत खोलीतून बाहेर आला. आणि मनातील भीती पळून गेली. साहस आणि भीती यामध्ये खूप कमी अंतर असते. माझे वडील पैलवान होते. त्यांच्यामध्ये खूप ऊर्जा होती. त्यांनी वेळोवेळी मला प्रोत्साहन दिले. त्यातूनच आयुष्यात आलेल्या अनेक अडचणींवर मात करत गेलो. 26/11 च्या मुंबई हल्‍ल्‍या वेळी ताज हॉटेलची पूर्वी रेकी केलेली होती. त्याचा फायदा झाला. त्यावेळी नागरिक आणि सहका-यांचे मृतदेह समोर होते. सर्वत्र रक्‍ताचा सडा पडलेला होता. क्षणभर भीती वाटली पण, तद्‌नंतर शांतचित्ताने धाडस दाखवत दहशतवाद्यांवर प्रत्युत्तरादाखल गोळीबार करत त्यांचा खात्‍मा केला. कॉन्सटेबल तुकाराम ओंबाळे यांनी शिताफीने कसाबला घट्‍ट पकडले. म्हणूनच भारतावर सीमेपलीकडून होणारा दहशतवाद जगासमोर आणता आला. या दुर्घटनेवेळी मी जीवंत आहे की नाही, याविषयी कुटुंबासह सर्वांना शंका वाटत होती. घटनास्थळावरून बाहेर आल्यानंतर प्रथम घरी फोन करून मी सुखरूप असल्‍याचे कळवले.

तुम्‍हा सिनेमाची ऑफर आली नाही का, याप्रश्नावर नांगरे पाटील म्‍हणाले, पूर्वी फिल्‍मस्टारची भेट घेण्यासाठी की त्यांची एक झलक पाहण्यासाठी तासंतास वेळ घालवला. पण मुंबईत नियुक्‍ती झाल्‍यानंतर सुरक्षाविषयक बाबींसाठी फिल्‍मस्टार माझी अपॉन्टमेंट घेण्यासाठी वेळ मागत असत. चित्रपटसृष्टीत चांगले व समाजोपयोगी कार्य करणारे अनेक अभिनेते-अभिनेत्री आहेत. अक्षयकुमार हा त्यातीलच एक आहे. त्याने मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबीयांना तीन कोटींची मदत केली. अक्षयबरोबर चांगली मैत्री असल्‍याचे नांगरे पाटील यांनी सांगितले. यावेळी उपस्थित युवकांनी नांगरे पाटील यांना प्रश्न विचारले. त्याची त्यांनी दिलखुलास उत्तरे दिली.

कार्यक्रमाचे आयोजन प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, नगरसेवक बाबू नायर यांच्या मार्गदर्शनाखाली राजेश पाटील, ज्योतिका मलकानी, किरण येवलेकर, प्रा. शिल्‍पागौरी गणपुले, चेतन फेंगसे, देवदत्त कशाळीकर यांनी केले. सुत्रसंचालन व आभार सुयश खटावकर यांनी मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button