breaking-newsमहाराष्ट्र

औरंगाबाद : एमजीएमच्या वसतीगृहात विद्यार्थिनीची गळा दाबून हत्या

औरंगाबादमधील महात्मा गांधी मिशन (एमजीएम) महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीचा वसतिगृहातच गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सिडकोतील महात्मा गांधी मिशनच्या वैद्यकीय रुग्णालयाच्या परिसरातील वसतिगृहात राहणाऱ्या एका विद्यार्थिनीचा मंगळवारी रात्री उशिरा मृतदेह आढळून आला. आकांक्षा अनिल देशमुख (वय २२) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. गळा आवळल्यामुळे तिचा खून झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झालं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकांक्षा बीड जिल्ह्य़ाच्या माजलगाव येथील मूळची रहिवासी असून एमजीएम महाविद्यालयात फिजिओथेरपी अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्षात शिकत होती. महाविद्यालय परिसरातीलच गंगा वसतिगृहातील २१३ क्रमांकाच्या खोलीत ती राहात होती. मंगळवारी सकाळी तिला आम्ही पाहिले होते. त्यानंतर पुन्हा तिला पाहिले नाही, असे काही विद्यार्थिनींनी पोलिसांना सांगितले. मंगळवारी अभ्यासक्रमाच्या दृष्टीने महत्त्वाचा वर्ग होता, पण आकांक्षा हजर राहिली नाही. दिवसभरही ती कोठे दिसली नसल्याने वसतिगृह अधीक्षकांना संशय आला. त्यांनी आकांक्षाच्या खोलीत जावून बघितले असता ती खाटेवर बेशुध्दावस्थेत पडून असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अधीक्षकांनी याची माहिती तात्काळ एमजीएम संस्थेच्या विश्वस्तांना आणि आकांक्षाचा भाऊ राहुल देशमुख याला दिली. राहुल देशमुख याने वसतिगृहात धाव घेवून आकांक्षाला एमजीएमच्याच रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

दरम्यान, आकांक्षा देशमुख हिचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटीत हलविण्यात आल्यावर बुधवारी शवविच्छेदन करण्यात आले. आकांक्षाचा मृत्यू गळा आवळल्यामुळे झाला असल्याचा अहवाल घाटीतील शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांनी दिल्याची माहिती आहे. दरम्यान, याप्रकरणी तक्रार देण्यास कोणी पुढे येत नसल्यामुळे सिडको पोलीस ठाण्यात तपासी अधिकारी महिला पोलिसाच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्रीपर्यंत सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी दिली.

एकुलती एक मुलगी-
मूळची माजलगाव येथील रहिवासी असलेली आकांक्षा ही तिच्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी होती. तिचे वडील हे माजलगावच्या एका साखर कारखान्यावर नोकरीस होते. अलीकडे ते निवृत्त झाले होते. तर आई ही शिक्षिका आहे. तिचे काका हे औरंगाबाद येथील महाविद्यालयात कलाध्यापक म्हणून काम करतात. चुलत भाऊही एमजीएममध्येच डॉक्टर आहे. दरम्यान, एमजीएमचे विश्वस्त अंकुशराव कदम यांनी घाटी रूग्णालयात जाऊन आकांक्षाच्या नातेवाइकांचे सांत्वन केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button