breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रव्यापार

एसटी महामंडळ व इंडियन ऑइल कंपनी यांच्यात सामंजस्य करार; एसटी महामंडळ लवकरच सुरु करणार सर्वसामान्यांसाठी पेट्रोल आणि डिझेल पंप

एसटी महामंडळ व इंडियन ऑइल कंपनी यांच्यात सामंजस्य करार झाला असून या करारानुसार एसटीचेही पेट्रोल आणि डिझेलपंप राज्यात पाहायला मिळणार आहेत. परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांनी या कराराचा तपशील दिला आहे. लॉकडाऊन काळात एसटी महामंडळाला मोठा आर्थिक फटका बसला असून मालवाहतुकीनंतर आता एसटीने उत्पन्नवाढीसाठी आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. उत्पन्नाचा नवा स्त्रोत म्हणून एसटी महामंडळ लवकरच सर्वसामान्य लोकांसाठी पेट्रोल पंप आणि डिझेल पंप सुरू करणार आहे. याबाबत परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी माहिती दिली.

सह्याद्री अतिथीगृह येथे परिवहन मंत्री परब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये एसटी महामंडळ आणि इंडियन ऑइल यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या सामंजस्य करारानुसार भविष्यात राज्यातील एसटी महामंडळाच्या मोकळ्या जागेवर ३० ठिकाणी पेट्रोल-डिझेलपंप आणि ५ ठिकाणी एल.एन.जी. सुरू करण्यात येणार आहेत. सदर पेट्रोल-डिझेलपंप, एल.एन.जी.पंप इंडियन ऑइलकडून बांधण्यात येणार असून त्याचे संचालन एसटी महामंडळाकडून करण्यात येणार आहे.

परब म्हणाले, करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर एसटीच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत असलेल्या प्रवासी तिकिटातून मिळणाऱ्या हजारो कोटीच्या उत्पन्नाला एसटीला मुकावे लागत आहे. अशा परिस्थितीमध्ये एसटीने पर्यायी उत्पन्नाचे मार्ग शोधण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये प्रामुख्याने मालवाहतुकीसारख्या उपक्रमाला सर्वच स्तरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच टायर पुनर्स्थिरीकरण प्रकल्पातून देखील व्यावसायिक स्तरावर उत्पादन घेण्यास सुरुवात झाली आहे. अशा अनेक उत्पन्न स्त्रोतांबरोबरच राज्यातील विविध ठिकाणी असलेल्या एसटीच्या मोकळ्या जागेवर इंडियन ऑइलच्या सहकार्याने सर्वसामांन्यांसाठी पेट्रोल-डिझेल, एल.एन.जी. पंप उभारले जाणार आहेत. या विक्रीतून एसटी महामंडळाला कायमस्वरूपी उत्पन्नाचा एक स्थिर स्त्रोत निर्माण होईल.

यावेळी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने व एसटीच्या वरिष्ठ अधिकऱ्यांसह इंडियन ऑइलचे महाराष्ट्र प्रमुख अमिताभ अखवैरी, महाव्यवस्थापक राजेश जाधव यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button