breaking-newsक्रिडा

एफसी गोवाचा केरळा ब्लास्टर्सवर एकतर्फी विजय

कोची – हिरो इंडियन सुपर लीगगच्या (आयएसएल) पाचव्या मोसमात एफसी गोवा संघाने आपली घोडदौड कायम राखताना केरळा ब्लास्टर्सचा 3-1 असा एकतर्फी पराभव करताना स्पर्धेत विजयी आगेकूच केली. यावेळी स्पेनचा स्ट्रायकर फेरॅन कोरोमीनास याने दोन, तर बदली खेळाडू मानवीर सिंग याने एक गोल करत विजयात मोलाचा वाटा उचलला. तर, ब्लास्टर्सच्या निकोला क्रॅमरेविचने एकमेव गोल भरपाई वेळेत नोंदविला.

गोव्याने खाते उघडण्याची शर्यत जिंकली. 11व्या मिनिटाला शॉर्ट कॉर्नरवर एदू बेदियाने डावीकडून क्रॉस शॉट मारला. हा चेंडू पलीकडील बाजूला अहमद जाहौह याच्यापाशी गेला. त्याने हवेत मारलेला चेंडू कोरोमीनासने उडी घेत हेडिंग केला आणि सफाईदार गोल नोंदविला. त्याने ब्लास्टर्सचा गोलरक्षक नवीन कुमारला काहीही संधी दिली नाही.

पूर्वार्धातील दोन मिनिटांच्य भरपाई वेळेत कोरोचा आणि गोव्याचा दुसरा गोल झाला. डावीकडून बेदियाने दिलेल्या पासनंतर कोरोने वेगाने धावत संधी साधली. त्याने निकोला क्रॅमरेविचचा रोखण्याचा प्रयत्न अपयशी ठरविला. यावेळी नवीन झेप टाकूनही चेंडू अडवू शकला नाही. उत्तरार्धात लॉबेरा यांनी 57व्या मिनिटाला जॅकीचंद सिंग याच्याऐवजी मानवीर, तर 62व्या मिनिटाला एदू बेदिया याच्याऐवजी ह्युगो बौमौस यांना बदली खेळाडू म्हणून उतरविले. 67व्या मिनिटाला मानवीरने कॉर्नरवर गोल केला. ब्लास्टर्सला पाठिंबा देण्यासाठी जमलेल्या 21 हजार 962 प्रेक्षकांना भरपाई वेळेत थोडाफार दिलासा मिळाला. संदेश झिंगनच्या पासवर निकोलाने सहा यार्डावरून लक्ष्य साधले.

सामन्याच्या सुरवातीला ब्लास्टर्सने प्रयत्न चांगले केले. पाचव्या मिनिटाला अहमदच्या ढिलाईमुळे केझीरॉन किझीटोला संधी मिळाली. त्याने मारलेला फटका गोव्याच्या सुदैवाने महंमद अली याने ब्लॉक केला. 17व्या मिनिटाला ब्लास्टर्सच्या हालीचरण नर्झारीची घोडदौड गोव्याच्या सेरीटॉन फर्नांडिसने रोखली. दोन मिनिटांनी नर्झारीने घेतलेल्या कॉर्नरवर स्लाविसा स्टोयानोविचने फटाक मारला, पण गोव्याचा गोलरक्षक महंमद नवाझने चेंडू अडविला.

42व्या मिनिटाला कोरोने उजवीकडून मोकळीक मिळताच आगेकूच केली. त्याने बेदियाला पास दिला, पण प्रतिस्पर्ध्याच्या दडपणामुळे बेदियाने मारलेला चेंडू गोलपोस्टवरून गेला. दुसऱ्या सत्रात 51व्या मिनिटाला बेदियाने मॅटेज पॉप्लॅटनिकला पाडले. त्यामुळे त्याला यलो कार्ड दाखवून पंचांनी ब्लास्टर्सला फ्री किक दिली. सैमीनलेन डुंगलने 40 यार्डावरून चांगला फटका मारला, पण नवाझने समोरच पडून उसळलेला चेंडू चपळाईने अडविला.

त्याच बरोबर कोरोने गोल्डन बुटच्या शर्यतीत आपली आघाडी कायम राखली आहे. त्याने 6 सामन्यांमध्ये 8 गोल केले आहेत. सर्जिओ लॉबेरा यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या गोव्याने सात सामन्यांत पाचवा विजय मिळविला असून एक बरोबरी व एका पराभवासह त्यांचे 16 गुण झाले. गोव्याची आघाडी कायम राहिली, पण दुसऱ्या क्रमांकावरील बेंगळुरूने दोन सामने कमी खेळून 13 गुण मिळविले आहे.

तिसऱ्या क्रमांकावरील मुंबई सिटी एफसीचे सात सामन्यांतून 13 गुण आहेत. बेंगळुरूचा गोलफरक 6 (10-4), तर मुंबईचा उणे 1 (7-8) असा आहे. चौथ्या क्रमांकावरील जमशेदपूर एफसीचे सात सामन्यांतून 11 गुण आहेत. ब्लास्टर्सला सात सामन्यांत दुसरा पराभव पत्करावा लागला, पण एकमेव विजय आणि चार बरोबरींमुळे केवळ सात गुणांसह हा संघ सातव्या स्थानावर आहे.

निकाल : 

केरळा ब्लास्टर्स एफसी : 1 (निकोला क्रॅमरेविच 90+2) पराभूत विरुद्ध
एफसी गोवा : 3 (फेरॅन कोरोमीनास 11, 45+2, मानवीर सिंग 67)

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button