breaking-newsपुणेमहाराष्ट्र

“एचसीएमटीआर’ रस्त्यासाठी निधीचे मॉडेल ठरेणा

निर्णय घेण्यास महापालिका प्रशासनास वेळच नाही

पुणे – शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेकडून तब्बल 6 हजार कोटी रुपये खर्चून उच्च क्षमता अंतर्गत वर्तुळाकार मार्गाला (एचसीएमटीआर) रस्ता उभारला जाणार आहे. या रस्त्याला गती देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत असतानाच; दुसरीकडे मात्र, या रस्त्याच्या कामासाठी निधी कसा उभारायचा याबाबत निर्णय घेण्यास पालिका प्रशासनास वेळ नाही. विशेष म्हणजे, महापालिकेने या निधी उभारणीसाठी सल्लागार कंपनी नेमली होती. त्यांच्याकडून निधी उभारणीचे सुमारे पाच ते सहा पर्याय सुचविले असले तरी, पालिका प्रशासनास मात्र, त्याबाबत निर्णय घेण्यास वेळ नसल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोच्या भूमिपूजन समारंभात मुख्यमंत्री फडणवीस यांनी एचसीएमटीआरचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. शहराच्या हद्दीतून जाणारा हा वर्तुळाकार मार्ग सुमारे 32 किलोमीटरचा असून, उन्नत स्वरूपात (एलिव्हेटेड) बांधल्या जाणाऱ्या या मार्गासाठी साडेसहा हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. या रस्त्यामुळे शहराच्या अंतर्गत भागांत वाहतुकीवर येणारा ताण नाहीसा होणार आहे.

या रस्त्यासाठी खर्च करणे पालिकेस शक्‍य नसल्याने, टोल, कर्ज किंवा बॉंड स्वरूपात कर्ज उभारून, बांधा-वापरा-हस्तांतरित करा (बीओटी) स्वरूपात, जाहिरातींचे हक्‍क देऊन अथवा हायब्रिड ऍन्युटी अशा विविध माध्यमातून या वर्तुळाकार रस्त्यासाठी निधी संकलन करण्याचे प्रस्ताव सल्लागाराने पालिकेला दिले आहेत. शहरातील अंतर्गत रस्त्यांवर टोल आकारणी करता येत नसल्याने इतर पर्यायांवरच पालिकेतर्फे विचारमंथन सुरू आहे. पालिकेचा निर्णय नक्‍की झाल्यानंतर राज्य सरकारच्या अंतिम मान्यतेसाठी तो सादर केला जाणार आहे. मात्र, पालिकेच्या स्तरावरच हा निर्णय होत नसल्याने हा रस्ता रखडला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button