breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

५८ बनावट डॉक्टर मोकाटच!

एमएमसीने तक्रार करूनही अद्याप गुन्हा दाखल नाही

परळच्या ‘कॉलेज ऑफ फिजिशिअन अ‍ॅण्ड सर्जन’ (सीपीएस) महाविद्यालयातून पदव्युत्तर पदविका उत्तीर्ण असल्याची खोटी प्रमाणपत्रे सादर करून बेकायदेशीररीत्या नोंदणी करणाऱ्या ५८ डॉक्टरांविरोधात ‘महाराष्ट्र वैद्यकीय परिषदे’ने(एमएमसी) आग्रीपाडा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देऊनही त्यांच्यावर अद्याप गुन्हा दाखल झालेला नसल्याची बाब समोर येत आहे.

ज्यांची खोटी प्रमाणपत्रे दाखवून विद्यार्थी रुग्णांची फसवणूक करत आहेत त्या ‘सीपीएसने’ही आमची प्रत्यक्ष फसवणूक झाली नसल्याचे कारण देत हे प्रकरण तडीस नेण्यास फारसा पुढाकार घेतलेला नाही. तर पोलीस हद्दीचे कारण देत तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ करत आहेत.

हा घोटाळा २०१६ साली उघडकीस आल्यानंतर या विद्यार्थ्यांनीच फसवणूक झाल्याचा दावा करत भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या प्रकरणी दलाल म्हणून काम करणाऱ्या डॉ. स्नेहल ज्ञाति याला अटक करण्यात आले होते. ज्ञाति याची एमएमसीने नोंदणीदेखील रद्द केली. यानंतर २०१७-१८ या वर्षांमध्ये ५८ डॉक्टरांनी खोटी प्रमाणपत्रे दाखवून एमएमसीकडे नोंदणी केल्याचे उघडकीस आले. यामध्ये स्त्रीरोगतज्ज्ञ, नेत्रतज्ज्ञ, अस्थिरोगतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, शल्याविशारद आदी डॉक्टरांचा समावेश होता. यांच्यावर जुलै, २०१८ मध्ये निलंबनाची कारवाई केली गेली. तोपर्यंत हे बोगस डॉक्टर रुग्णांना सेवा देत होते.

एमएमसीने ५८ जणांवर निलंबनाची कारवाई केली असली तरी या डॉक्टरांना खोटी कागदपत्रे पुरविणाऱ्यांचा छडा लावणे गरजेचे आहे. एमएमसीमध्ये झालेल्या सुनावणीमध्ये या डॉक्टरांनी दलालांमार्फत प्रमाणपत्रे मिळविल्याचे नमूद केले आहे. तेव्हा या डॉक्टरांवर खोटी कागदपत्रे सादर करून एमएमसीची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची लेखी तक्रार एमएमसीने आग्रीपाडा पोलीस ठाण्यात सुमारे महिनाभरापूर्वी दिली. मात्र यासंबंधात अजून गुन्हादेखील दाखल झालेला नाही, असे एमएमसीचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे यांनी सांगितले.

यासंबंधी सीपीएस महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ. गिरीश मैंदरकर यांनी सांगितले, महाविद्यालयाची प्रत्यक्ष फसवणूक झालेली नसल्याने महाविद्यालयाला गुन्हा दाखल करण्याचे अधिकार नाहीत. सहतक्रारदार म्हणून सहभागी होता येईल, असे महाविद्यालयाच्या कायदे विभागाने सांगितले आहे. त्यामुळेच आम्ही तक्रार दाखल केलेली नाही. याआधी २० डॉक्टरांनी केलेल्या तक्रारीमध्ये आम्ही सहतक्रारदार होतो. त्या तपासामध्ये महाविद्यालयातील कोणीही यामध्ये सहभागी असल्याचे समोर आलेले नाही.

याआधीच्या प्रकरणाचा तपास भोईवाडा पोलीस ठाण्यामध्ये सुरू आहे. तसेच ज्या महाविद्यालयाची खोटी कागदपत्रे प्राप्त झालेली आहेत, ते महाविद्यालयही भोईवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने एमएमसीने भोईवाडा पोलीस ठाण्यातच तक्रार दाखल करावी, असे लेखी पत्र आम्ही दिले आहे. यावरही एमएमसीने आग्रीपाडा पोलीस ठाण्यामध्येच गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली होती. त्यानुसार नंतर पोलीस ठाण्यामध्ये भेट घेण्यास कळवितो, असे सांगून एमएमसीचे अधिकारी परत आलेले नाहीत. आता गणपतीच्या बंदोबस्ताची धावपळ सुरू असल्याने हे संपल्यानंतर याची तात्काळ दखल घेऊन एमएमसीच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून नेमके प्रकरण समजून घेऊनच गुन्हा दाखल केला जाईल.        – जयदीप गायकवाड, पोलीस निरीक्षक, आग्रीपाडा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button