breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

‘एक थी बेगम’ प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई नावाच्या मायानगरीच्या भूतकाळात बरंच काही दडलं आहे, या भूतकाळातील एक पान होतं बेगमच्या सूडाचं. ८० च्या दशकातील सत्य घटनेपासून प्रेरित होऊन एमएक्स प्लेअरनं नुकतीच ‘एक थी बेगम’ ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे. मुंबईत ८० चं दशक अनेक उलथापालथीचं होतं. हे शहर तेव्हा घड्याळ्याच्या काट्यावर नाही तर ते गुन्हेगारांच्या बंदुकीच्या धाकावर जीव मुठीत घेऊन चालायचं. आता त्या विश्वाचा मागमूसही या शहरात नसला तरी या पटावरच्या एकमेकांना शह काटशह देणाऱ्या राजा आणि राणीच्या त्या कहाण्या अजूनही जिवंत आहेत.

मुंबईच्या ‘माफीया क्वीन’ पैकी एक म्हणून ओळखली जाणारी क्वीन, राणी आणि बेगम होती ती झहीर भाटकर (अंकित मोहन) या गुन्हेगाराची. दुबईत बसून या शहराला चालवणारा शहराचा मोठा डॉन मकसूद (अजय गेही)कडून झहीरच्या खूनाला संमती मिळते. झहीर हा एकेकाळचा मकसूदचा गुन्हेगारीतला जोडीदार. मात्र  मकसूदसोबत काम करताना या विश्वातले काही अलिखित नियम मोडले जात असल्याचं लक्षात आल्यावर गँगमधून तो वेगळा होऊन आपली गँग तयार करतो. डॉनच्या अवघड जागेचं दुखणं होऊन बसलेल्या झहीरच्या खूनाच्या कटाला मकसूदकडून संमती मिळते. 

मात्र हे टोकाचं पाऊल  उचलेपर्यंत या आधीच्या काळात अनेक नाट्यमय घटना घडलेल्या असतात.  साधारण पहिल्या दोन भागात यामागच्या गोष्टींचा उलगडा होत जातो.  मकसूदची संमती, यंत्रणेतील दोन भ्रष्ट पोलिस अधिकारी आणि मकसूदसाठी काम करणारा नाना म्हात्रे झहीरचा कपटानं ‘गेम’ करतो आणि इथूनच सुरु होतो  झहीरची बेगम अशरफ भाटकरचा (अनुजा साठे) सूडाचा प्रवास….जोपर्यंत झहीरच्या एक एक खून्याला रस्त्यातून बाजूला करत नाही तोपर्यंत स्वस्थ न बसण्याची शप्पथ अशरफ घेते. 

 गुन्हेगारी विश्वाच्या पूर्णपणे विरोधात असलेली, पाचवेळा नमाज आदा करणारी आणि कधीही मर्यादा न ओलांडणारी स्त्री या सूडाग्नीच्या ज्वाळेत कधी अशरफची सपना होते हे कळत नाही. मात्र ती सपना कशी होते? तिच्या सूडाचा पहिला बळी कोण ठरतो? हेही पाहणं रंजक आहे, विशेष म्हणजे मराठीबरोबर हिंदीतही अगदी फ्रीमध्ये ही वेबसीरिज  प्रेक्षकांना पाहण्यासाठी उपलब्ध आहे. 

कोणतीही गँग हाताशी नसताना केवळ बुद्धीचातुर्यानं ही बेगम रस्त्यात येणाऱ्याला शह देत पुढे सरकत जाते. वाटेत येणाऱ्या सगळ्यांची शिकार केल्यानंतर या बेगमची मोठी शिकार अजूनही मोकाट असते त्या शिकारीपर्यंत पोहोण्यात बेगम यशस्वी होते की तिचाही तिच्या शोहरसाखाच दुर्दैवी अंत होतो हेही शेवटपर्यंत पाहणं तितकंच कुतूहल ताणणारं आहे.

सचिन दरेकर लिहित, दिग्दर्शित या सीरिजमध्ये अजुना, अंकितसोबतच चिन्मय मांडलेकर, अभिजित चव्हाण, संतोष जुवेकर, राजेंद्र शिसटकर, रेशम, प्रदीप डोईफोडे, विठ्ठल काळे, नाझर खान, विजय निकम, अनिल नगरकर, सुचित जाधव, राजू आठवले यांसारखे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button